विधिमंडळ परिसरातच आमदारांचं धूम्रपान

December 25, 2008 7:09 AM0 commentsViews: 5

25 डिसेंबर, नागपूरसार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी धूडकावणं नवीन नाही. पण आमदारांनीच ही बंदी धुडकावून लावल्याचं चित्र समोर आलं आहे. विधीमंडळ परिसरात काही आमदार खिडकीत,सिगरेटचे झुरके मारत, असल्याचं चित्र कॅमेरात कैद झालं आहे. विधीमंडळ परिसरात होणार्‍या या धुम्रपानावर,अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर दखल घेणार आहेत का अशी चर्चा सुरू आहे. बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. लंचनंतर हे आमदार विधानसभेच्या कॉरिडॉरमध्ये फिरत धूम्रपान करत होते. एका वृत्तपत्राच्या फोटोग्रापरच्या ही गोष्ट निदर्शनास आली. खरं तर विधानसभेच्या परिसारात सर्वत्र क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बघितलं तर लायटर किंवा काडेपेटीसारख्या वस्तू त्यांना आत आणूच कशा दिल्या गेल्या, हा प्रश्नही आता विचारण्यात येत आहे.कायदेतज्ज्ञांच्या मते अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर त्यांच्यावर कारवाई करतील, असं मानलं जात आहे. यातील एक आमदार शिवसेनेचा असल्याची माहिती मिळाली आहे. अर्थातच आता सत्ताधारी आघाडीतील पक्ष हा मुद्दा लावून धरतील, असं बोललं जात आहे. तज्ज्ञांच्या मते या आमदारांची आमदारकी रद्द करण्यापर्यंत देखील कडक कारवाई त्यांच्यावर होऊ शकते.

close