अडथळा हटला, उस्मानाबादकरांना मिळालं हक्काचं पाणी

March 28, 2013 2:00 PM0 commentsViews: 22

28 मार्च

उस्मानाबाद : दुष्काळात होरपळणार्‍या उस्मानाबादकरांना दिलासा मिळालाय. गेल्या 15 वर्षांपासून प्रतीक्षा असणार्‍या उजनी योजनेचं काम आता पूर्ण झालंय. उजनीचं पाणी महिनाभरापूर्वी जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झालं होतं. मात्र हातलादेवीच्या डोंगरामुळे शहरात पाणी दाखल होत नव्हतं. पाण्याच्या अती दाबामुळे पाईपलाईनला गळती सुरू झाली होती. मात्र बुधवारी या पाईपलाईनच्या गळतीच्या दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर उजनीचं पाणी शहरात दाखल झालं. उस्मानाबाद ते उजनी असं 115 किलोमिटर अंतर असणार्‍या या पाणी पुरवठा योजनेला मान्यता देण्यात आली होती. मात्र नगरपालिकेच्या घोटाळ्यामुळे हे पाणी मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र शासनाने दुष्काळ लक्षात घेता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 51 कोटींचा निधी देऊन ही योजना पूर्ण करा असे आदेश दिल्यानंतर ही योजना पूर्ण झाली आहे. उजनीचं पाणी नगरपालिकेतल्या सत्ताधारी असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे पाणी आमच्यामुळे आलं असं जरी सांगत असले तरी हे पाणी केवळ दुष्काळ असल्यानच उस्मानाबादकरांना मिळाल्याचं नागरीक सांगत आहेत.

close