14 वर्षांच्या मुलीच्या नावावर लाटलं 1 लाखाचं कर्ज

March 28, 2013 2:29 PM0 commentsViews: 14

28 मार्च

कोल्हापूर : इथं 2008 सालच्या कर्जमाफीतले अनेक घोटाळे दिवसेंदिवस समोर येत आहे. जिल्ह्यातल्या एका सेवा सोसायटीच्या चेअरमननं चक्क आपल्या 14 वर्षाच्या मुलीच्या नावावर सव्वा लाखांची कर्जमाफी लाटल्याचं उघड झालंय. पन्हाळा तालुक्यातल्या निवडे गावातल्या मारुती सेवा संस्थेत हा प्रकार घडलाय. या सोसायटीचे चेअरमन अरुण पाटील यांनी आपली मुलगी पूजा पाटील हिच्या नावावर 1 लाख 13 हजार रुपयांचं कर्ज उचलल्याचं दाखवलंय. आणि केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ते माफही करुन घेतलंय.

18 वर्ष पूर्ण नसताना ही कर्जमाफी लाटण्यात आल्याने मुलीच्या वडिलांवर कारवाई व्हावी अशी मागणी होतेय. याच सेवा संस्थेच्या व्हाईस चेअरमननी देखील अरुण पाटील यांनी बेकायदेशीररित्या मुलीच्या नावाने कर्जमाफी लाटल्याचा आरोप केला आहे. पण, अरुण पाटील यांनी वयाचा कुठंच कायदा नाही असा दावा आयबीएन लोकमतशी बोलताना केलाय. 18 वर्ष पूर्ण असल्याशिवाय सहकार क्षेत्रातल्या कोणत्याही संस्थेत सभासद होता येत नाही. तरीही पाटील यांनी आपली मुलगी 14 वर्षांची असतानाही तिच्या नावानं कर्ज घेऊन एक प्रकारे सहकारालाच आव्हान दिलंय असं म्हणावं लागेल.

close