नरेंद्र मोदींना अमेरिकेचं निमंत्रण

March 28, 2013 4:23 PM0 commentsViews: 22

28 मार्च

गुजरात : अमेरिकेतील व्हार्टन स्कूलने नरेंद्र मोदींचं भाषण रद्द करून नवा वाद निर्माण केला होता. आता अमेरिकेच्याच सिनेटर्सनी नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलं आहे. आज अमेरिकेच्या सिनटर्सनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गोध्रा दंगलीनंतर अमेरिकेनं मोदींना व्हिसा नाकारला होता. पण, राष्ट्रीय पातळीवर मोदींचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन आता अमेरिकेनं आपलं धोरण काहीसं मवाळ केल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन सिनेटर आणि काही उद्योजकांनी गुजरातच्या विकास मॉडेलची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मोदींची भेट घेतली आणि त्यांना जूनमध्ये अमेरिकेला येण्याचं निमंत्रणही दिलं. पण, अमेरिकेनं मोदींवरची व्हिसा बंदी अजून उठवलेली नाही.

4 मार्च रोजी अमेरिकेतल्या प्रतिष्ठीत व्हार्टन स्कूलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण रद्द केलं होतं. मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नसल्याने ते सॅटेलाईटद्वारा भाषण करणार होते. व्हार्टन स्कूलच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोदी यांना आमंत्रित करण्यास विरोध केला होता. यावरून वाद वाढायला लागल्यानंतर मोदींचं भाषण रद्द करण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला होता. मोदींचं भाषण रद्द केल्यामुळे तीव्र पडसाद उमटले होते.व्हार्टनच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेचे नेते सुरेश प्रभू यांनीही व्हॉर्टनमधील आपलं भाषण रद्द केलं होतं. विशेष म्हणजे प्रभू हे व्हार्टन इथल्या इंडिया इकॉनिमिक फोरमचे सदस्य आहेत. मोदींचं भाषण रद्द करण्याचा निर्णय हा देशाचा अपमान असल्याचं प्रभू यांनी म्हटलं होतं.

close