पाडगावकरांचं मराठी बायबल

December 25, 2008 2:52 PM0 commentsViews: 108

25 डिसेंबर, मुंबई राम जगताप इश्वरी संदेशाने प्रेरित होऊन इश्वराच्या लाडक्या लेकरांनी मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेला ग्रंथ म्हणजे बायबल. बायबल हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ, पण या धर्माबाहेरचेही अनेक जण या ग्रंथाच्या प्रेमात पडले आहेत. मराठीतले मान्यवर कवी मंगेश पाडगावकर हे त्यापैकीच एक आहेत. पाडगावकरांनी बायबलचा चक्क मराठी अनुवादही केला आहे. ख्रिस्ती लेखक फा. मायकल बायबलबद्दल म्हणाले , " बायबल हे एक पुस्तक नसून ती लायब्ररी आहे, अनेक पुस्तकांची लायब्ररी आहे." कारण बायबलमध्ये जुना करार आणि नवा करार मिळून तब्बल 73 पुस्तकंआहेत. या बायबलनं पाडगावकरही प्रभावित झाले आणि त्यांनी बायबलचं मराठीत भाषांतर केलं आहे. कवी मंगेश पाडगावकर बायबलविषयी म्हणाले, " इंग्रजी बायबल जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा त्या भाषेच्या सौंदर्यानं मी भारावून गेलो. बायबलच्या आध्यात्मिक अनुभूतीच्या सखोल अशा अभिव्यक्तीनं मी अवाक् झालो. " त्याच भारावलेल्या अवस्थेतच पाडगावकरांनी इंग्रजी बायबलचं मराठीत रसाळ आणि सुरस भाषांतर केलं आहे. पण मूळ बायबल लिहिलं गेलं ते हिब्रू, ग्रीक आणि अरेमाइक भाषांमध्ये. बायबलचं भाषांतर जगातल्या जवळपास सर्व भाषांत झालं आहे. चार्लस डिकन्स हा साहित्यिक म्हणतो, की जगात होऊन गेलेल्या आणि होणार्‍या सर्व पुस्तकांमध्ये सर्वात्कृष्ट पुस्तक म्हणजे बायबल आहे. कारण बायबलमध्ये जगातल्या सगळ्या परंपरा, तत्त्वज्ञानं एकत्र पाहायला मिळतात. त्याविषयी फादर मायकेल ख्रिस्ती बोलतात, "बायबल हा ग्रंथ थोडासा विज्ञाननिष्ठ आहे. अगदी बायबलची पहिली कथा जरी आपण घेतली, उत्पत्तीची तीही विज्ञाननिष्ठ आहे. बायबलची भाषाही उत्तम आहे. त्याविषयी पाडगावकर म्हणतात, " इंग्रजी माणसाला जर विचारलं की इंग्रजी भाषेचं आजचं वैभव आहे ते कुणी निर्माण केलं, तर तो असं सांगतो की, बायबल आणि शेक्सपिअर अशा दोघांनी ही भाषा घडवलेली आहे. "शेक्सपिअरच्या तीन नाटकांचं पाडगावकरांनी मराठीत भाषांतर केलं आहे .आणि आता बायबलचं..त्यामुळे मराठी साहित्यातही मोलाची भर पडली आहे.

close