शीतल साठेला न्यायालयीन तर सचिनला पोलीस कोठडी

April 3, 2013 11:40 AM0 commentsViews: 77

03 एप्रिल

मुंबई : कबीर कला मंचचे कार्यकर्ते शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांना मंगळवारी आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. आज दोघांना कोर्टासमोर हजर केले असता शीतल साठेला 17 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी तर सचिन माळीला एक आठवड्याची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दोघांवरही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आपल्या कलाकृतींतून या दोघांनी समाजात असंतोष पसरवला, असाही आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांच्या अटकेला भारीप नेत प्रकाश आंबेडकर, आनंद पटवर्धन, कॉम्रेड प्रकाश रेड्डींनी विरोध केला. या दोनही कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकार गदा आणत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

शीतल साठे आणि सचिन माळी गेल्या दोन वर्षांपासून भूमिगत होते. त्यांच्यावर सरकारने नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप ठेवला होता. दलित आणि शोषितांच्या समस्या मांडतांना समाजात असंतोष पसरवण्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. विधानभवनाबाहेर सत्याग्रह करण्यासाठी ते आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली. अटक होण्यापूर्वी शीतल आणि सचिनने पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

दोघा कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी भारीप नेते प्रकाश आंबेडकर, कॉम्रेड प्रकाश रेड्डी आणि भालचंद्र कांगो.. तसंच फिल्ममेकर आनंद पटवर्धन विधानभवनाजवळ सत्याग्रहासाठी आले होते. कबीर कला मंच बचाव समितीच्या वतीने त्या सगळ्यांनी पोलीस आणि सरकारवर जोरदार टीका केली.

यापूर्वी छत्तिसगढमधल्या प्रा. बिनायक सेन यांच्यावरही देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. त्यांना जामीन मिळू नये, म्हणून छत्तीसगड सरकारने जोरदार प्रयत्न केले. पण अखेरीस सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. कबीर कला मंचच्या तरुण कलाकारांना बुधवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने शितल साठेला 17 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली तर सचिन माळी एक आठवड्याची पोलीस कोठडी सुनावली आहे.

close