थरारक सामन्यात मुंबईचा 2 रन्सने पराभव

April 4, 2013 6:20 PM0 commentsViews: 29

04 एप्रिल

अखेरच्या बॉलपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत बंगलोर रॉयलने मुंबई इंडियन्सचा 2 रन्सनं राखून पराभव केला. ख्रिस गेलच्या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर घरच्या मैदानावर पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोर रॉयलनं 5 विकेट गमावत 156 रन्स केले. पण गेल शिवाय बंगलोरचे इतर बॅट्समन मात्र अपयशी ठरले. याला उत्तर देताना मुंबईच्या रिकी पॉण्टििंग आणि सचिन तेंडुलकर या ओपनिंग जोडीनं 52 रन्सची पार्टनरशिप केली. ही जोडी आऊट झाल्यावर दिनेस कार्तिकनं धुवाँधार बॅटिंग करत मॅचमध्ये रंगत आणली. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी 10 रन्सची गरज असताना बंगलोरच्या विनय कुमारनं कार्तिक आणि अंबाती रायडूला लागोपाठ आऊट करत मुंबईला धक्का दिला. कायनर पोलार्डनं पाचव्या बॉलवर फोर मारत चुरस निर्माण केली. पण शेवटच्या बॉलवर विनय कुमारनं एक रन दिला आणि बंगलोरनं शानदार विजय मिळवला.

ख्रिस गेल नावाचं वादळ

आयपीएल म्हटलं की, सिक्स आणि फोरची बरसात ही आलीच. आणि त्यातही ख्रिस गेल असला तर पर्वणीच. ख्रिस गेलनं आयपीएलच्या सहाव्या हंगामाची सुरुवातही अगदी दणदणीत केली आहे. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्यानं सिक्स आणि फोरची बरसात करत क्रिकेटप्रेमींना खुष केलं. सावध सुरुवात करणार्‍या गेलनं मॅचच्या अखेरीस फटकेबाजी करत टीमला दिडशे रन्सचा टप्पा पार करुन दिला. अवघ्या 58 बॉलमध्ये गेलनं 11 फोर आणि 5 सिक्स मारत नॉटआऊट 92 रन्स केले. आता आयपीएलमध्ये सलग तिसर्‍यांदा ऑरेंज कॅपचा मान पटकावणार का याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

जसप्रीत बुमरा चमकदार कामगिरी

पण आजची मॅच गाजवली, ती मुंबई इंडियन्सचा युवा बॉलर जसप्रीत बुमरानं. आयपीएलमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणार्‍या जसप्रीतसाठी ही मॅच कायमची लक्षात राहणारी ठरणार आहे. कॅप्टन रिकी पॉण्टिंगनं पाचव्या ओव्हरमध्ये जसप्रीतच्या हाती बॉल दिला. पण बंगलोरच्या विराट कोहलीनं पहिल्या चार बॉलमध्ये तीन फोर मारत जसप्रीतला दणका दिला. पण यानंतर मात्र चमत्कार घडावा तसा बदल झाला. कॅप्टन पॉण्टिंग आणि सचिन तेंडुलकरनं त्याला निराश न होण्याचा सल्ला दिला.आणि पुढच्या बॉलवर जसप्रीतनं विराट कोहलीची विकेट घेतली. तर मयांक अग्रवाल आणि करुन नायरलाही त्यानं पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. जसप्रीतनं चार ओव्हरमध्ये 32 रन्स देत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

close