इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 45 वर

April 5, 2013 8:16 AM0 commentsViews: 17

05 एप्रिल 2013

ठाणे – ठाणे जिल्ह्यात शिळफाट्याजवळ सात मजली इमारत कोसळून आता 30 तास उलटले आहेत. आता मृतांची संख्या 45 वर पोहचली आहे. यांमध्ये 11 मुलांचा समावेश आहे. या अपघातात 69 जण जखमी झाले आहेत. ढिगार्‍याखाली आणखी 20 ते 25 जण अडकल्याची भीती अशी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सनं (NDRF) व्यक्त केली. इमारतीचा ढिगारा काढण्याचं काम अजून सुरूच आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक 64 ब मधल्या लकी कंपाऊंडमधली ही इमारत होती. जमील कुरेशी आणि नफीस कुरेशी या दोन भावांनी ही इमारत फक्त तीन महिन्यांमध्ये उभारली. या इमारतीत 37 फ्लॅट्स बांधण्यात आले होते. त्यापैकी 28 फ्लॅट्समध्ये लोक राहत होते. इमारतीमधल्या चार खोल्यांमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालत होते. संध्याकाळी हे क्लासेस सुरू असतानाच अचानक ही इमारत कोसळली. दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीचं काम सुरू झालं होतं. त्यामुळे छताचं प्लॅस्टरही गळून पडत होतं. संध्याकाळी अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली. दरम्यान, या बिल्डर्सच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा बिल्डर फरार आहे. या दुर्घटनेमुळे ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दरम्यान, या घटनेला जबाबदार असणार्‍यांवर लवकरात लवकर कडक कारवाई केली जाईल,अशी ग्वाही ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी दिलीये. बचावकार्य अजूनही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. आणि घटनेचा आढावा घेतला.

हॉस्पिटलमध्ये मृतदेहांना ठेवायला जागाच नाही

जखमींना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेत 69 जण जखमी झालेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. ठाण्यातील कळवा शिवाजी रुग्णालयामध्ये शवागाराची मृतदेह ठेवण्याची क्षमता संपल्यामुळे मृतदेह भिवंडी रुग्णालय आणि सायन रुग्णालयात पाठविण्यात आलेत. सध्या कळवा हॉस्पिटल 10 जखमी आहेत, मुंब्रामध्ये कळशिकर हॉस्पिटल 26 जणांवर उपचार सुरू आहेत.

दीड वर्षांची चिमुकली सुखरूप

सात मजल्याची इमारत काल पत्त्याच्या बंगल्या सारखी कोसळली. 41 लोकांचा यात मृत झाला. पण या घटनेत चमत्कारीकरित्या एक दीड वर्षाची चिमुकली कोणतीही इजा न होता सुखरूप बाहेर आली. इमारतीच्या ढिगार्‍याखालून जवळपास 18 तासांनतर या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. या मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. तिला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांना तिची तपासणी करून वडीलांकडे सोपवले, वडिलांकडे गेल्यावर मला आईला भेटायचं, आई कुठे आहे असे प्रश्न तिच्या बोबडीत ऐकून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

इमारतींच्या बांधकामांत भ्रष्टाचारामुळे अपघात -प्रभू

मोठमोठ्या अधिकृत इमारतींचं बांधकाम करताना दर्जाबाबत दुर्लक्ष केल्याने अपघात होतात तर अनधिकृत इमारतींच्या अपघातांना मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचं मत नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी व्यक्त केलं आहे.

आयबीएन-लोकमतचा सवाल

- ठाणे-कल्याणमधल्या अनाधिकृत बांधकामाला कुणाचा वरदहस्त मिळतोय ?- सात मजली इमारत दोन महिन्यात कशी उभी राहते ?- महापालिकेनं आतापर्यंत कारवाई का केली नाही ?- भूखंड माफिया आणि राजकारणी यांचं साटंलोटं आहे का ?- अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी कोण दबाव आणतं ?

close