अनधिकृत इमारतीने घेतले 52 बळी

April 5, 2013 1:31 PM0 commentsViews: 18

05 एप्रिल

ठाणे जिल्ह्यात शिळफाट्याजवळ 7 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या आता 52 झाली. यामध्ये 12 मुलांचा समावेश आहे. या अपघातात 60 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. इमारतीचा ढिगारा काढण्याचं काम अजून सुरूच आहे. ढिगार्‍याखाली आणखी 20 ते 25 जण अडकल्याची भीती आहे. प्रभाग क्रमांक 64 ब मधल्या लकी कंपाऊंडमधली ही इमारत होती. या प्रकरणी या बिल्डर्स विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम शेख या बिल्डरला ठाणे क्राईम ब्रँचनं अटक केली. तर त्याचा पार्टनर जमील कुरेशी अजून फरार आहे. तर मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत सरकारने जाहीर केलीय.

ठाण्यातल्या शिळफाट्याजवळची सात मजली अनधिकृत इमारत गुरुवारी अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली आणि अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेकजण जखमी झाले. इमारतीमधल्या चार खोल्यांमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालत होते. संध्याकाळी हे क्लासेस सुरू असतानाच ही इमारत कोसळली. त्यामुळे मृतांमध्ये अनेक चिमुरड्यांचाही समावेश आहे. घटनेला अनेक तास उलटले तरी ढिगार्‍याखाली अनेक जण अडकल्यानं या दुर्घटनेची तीव्रता वाढली. या दुर्घटनेत आपल्या जवळच्यांना गमावलेल्यांचा एकच प्रश्न आहे याला जबाबदार कोण?

या इमारतीच्या बिल्डर्सच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सलीम शेख या बिल्डरला ठाणे क्राईम ब्रँचनं अटक केलीय. तर त्याचा पार्टनर जमील कुरेशी अजून फरार आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं पोलीस सांगत आहे.

पण धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक 64 ब मधल्या लकी कंपाऊंडमधली ही इमारत अवघ्या तीन महिन्यांत उभी राहिली. या इमारतीत 37 फ्लॅट्स बांधण्यात आले होते. त्यापैकी 28 फ्लॅट्समध्ये लोक राहत होते. तीन महिन्यांत एक बिल्डिंग उभी राहत असताना महापालिका प्रशासन, सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, काय करत होते हा प्रश्न विचारला जातोय. या भागातल्या अनधिकृत बांधकामांसाठी बिल्डरांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा वरदहस्त मिळतोय, असा थेट आरोप आरटीआय कार्यकर्ते निसार कारवणिकर यांनी केला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाला आणि जखमींना भेटण्यासाठी हॉस्पिटलला भेट दिली. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सरकारनं अनधिकृत बांधकामांसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केलीय. पण कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी सरकारची थेट कारवाई लोकांना हवी.

close