दिल्लीत सुरक्षा विषयक महत्त्वाची बैठक

December 26, 2008 11:03 AM0 commentsViews: 3

26 डिसेंबर, दिल्लीलष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची एक तातडीचं बैठक, पंतप्रधान कार्यालयात झाली. या बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग तसंच तिन्ही दलाचे प्रमुख हजर होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणनही या बैठकीला उपस्थित होते. गेले काही दिवस पाकिस्तानकडून युद्धाच्या वल्गना केल्या जात आहेत. दोन दिवसांपासून पाकिस्ताननं राजस्थान सीमेवर सैन्याची जुळवाजुळव केली जात आहे. भारतीय सीमांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा झाली.ही बैठक पूर्वनियोजित नव्हती. मात्र पाकिस्तानकडून उचललेल्या लष्करी पावलांमुळे तसंच बेफाम विधानांमुळे ही बैठक बोलावली गेल्याचं मानलं जात आहे. भारताला युद्ध नकोय, पण पाकिस्ताननं आपल्या भूमीवरील दहशतवादी तळांवर कारवाई करावी, असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी पाकवरचा आंतरराष्ट्रीय दबावही वाढत चालला आहे. पाकिस्ताननं मात्र भारताच्या सर्व सूचना धुडकावून लावून रोजच्या रोज युद्धाच्या धमक्या देत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून कुरापत काढली गेल्यास आपली संरक्षण यंत्रणा सज्ज असावी, या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाकिस्ताननं जर त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही, तर भारतापुढील सर्व पर्याय खुले असल्याचे भारतानं याआधीच स्पष्ट केलं आहे. मात्र पाकिस्ताननं त्यादृष्टीने कोणतीही पावले उचललेली नाहीत. या परिस्थितीत पाकवर लष्करी कारवाई करायची वेळ आल्यास पुरेसा आंतरराष्ट्रीय पाठिंब मिळवता येईल का ? या दृष्टीने देखील विचार केला गेला.

close