‘अजित पवार माफी नको, राजीनामा द्या’

April 8, 2013 9:17 AM0 commentsViews: 74

08 एप्रिल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज सकाळपासूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातून चौफेर टीका झाल्यानंतर आज विधीमंडळातही त्यांच्या वक्तव्यांचे तीव्र पडसाद उमटले. माफी नको, राजीनामा द्या, अशी मागणी करत शिवसेना भाजपच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. या गदारोळातच उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहांमध्ये माफी मागितली. त्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाबाहेरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेराव घातला. अजित पवार यांनी कालच प्रसिद्धीपत्रक काढून माफी मागितली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार यांच्या वतीनं माफी मागितली. मात्र, त्यानंतरही वातावरण पुरते निवळलेले नाही. राजकीय नेत्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, बारामतीमधले मतदार या सर्वांनी अजित पवार यांच्या वक्तव्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

सोलापूरात निषेध

अजित पवार यांच्या वक्तव्याचा सोलापूरातूनही निषेध व्यक्त होत आहे. अकलूजमध्ये जनसेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी अजित पवारांच्या पुतळ्याचं दहन केलं. सामाजिक संघटनांसोबतच दुष्काळग्रस्त शेतकरीही या निषेध मोर्च्यात सहभागी झाले होते. याशिवाय सोलापूर शहर आणि मोहोळ तालुक्यातल्या पाटकूलमध्येही शेतकर्‍यांनी आंदोलन केलं.

अजित पवार त्यांच्या वक्तव्यावर काल माफी मागितली, त्यांनी पत्रकात म्हटलं..इंदापूर मधील सभेमुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. दुष्काळ निवारणाच्या मोहिमेला माझ्या वक्तव्यामुळे बाधा पोहोचू नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी राज्यातल्या जनतेची माफी मागत आहे.परस्पर सामंजस्य आणि एकजुटीने दुष्काळाचा सामना करण्याची गरज आहे.

close