विठ्ठलाच्या दारी लेकरांचे बेहाल !

March 28, 2013 1:42 PM0 commentsViews: 25

गोविंद वाकडे, पुणे

28 मार्च

अध्यात्मासह सुसंस्कृत शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून आळंदीत विद्यार्थी येतात..पण त्यांना सध्या इथं मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. इथल्या गुरुकुलांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळत नसल्यानं त्यांना अनेक आजारांनी ग्रासलंय. वारकर्‍यांचं श्रद्धास्थान असलेली देवाची आळंदी या गोष्टीमुळं वादाच्या भोवर्‍यात सापडली.

देवाची आळंदी… इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेलं एक पवित्र गाव…अध्यात्माचं शिक्षण देणारी नगरी…अध्यात्मासोबतच शालेय शिक्षण घेण्यासाठी या शहरात शेकडो गुरूकुलांची उभारणी करण्यात आलीय. परंतु , इथल्या गुरुकुलांची परिस्थिती पाहिली तर मन विषण्ण होतं. इथं मुलांना ना खेळण्यासाठी मोकळं मैदान आहे, ना सकस आहार… एकाच खोलीत 25 ते 30 मुलांची झोपण्यासाठी केलेली अत्यंत असुरक्षित व्यवस्था आहे. हे चित्र बहुतांश गुरूकुलांमध्ये पाहायला मिळते. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होतोय.

शहरात तीनशेपेक्षा अधिक गुरूकूल, धर्मशाळा आहेत. एका गुरूकुलात शंभर ते सत्तर विद्यार्थी याप्रमाणे 20 हजारांहून अधिक मुले इथं शिक्षण घेतात. एकाही गुरूकूलाची नोंद नगरपालिकेकडे नाही. गलिच्छ वातावरण आणि सकस आहाराचा अभाव या इथल्या प्रमुख समस्या आहेत. हिमोग्लोबीनची कमतरता, त्वचेच्या अनेक आजारांमुळे विद्यार्थी ग्रस्त झालेत.

आळंदी नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी वस्तुस्थिती मान्य करत कारवाईचे संकेत दिलेत. परंतू गुरूकुलांमध्ये ज्ञानार्जन करणार्‍या महाराजांनी मात्र सर्व आरोप फेटाळले.

इथल्या गुरुकुलांची वस्तुस्थिती पाहिल्यानंतर इथं शिकवणारे महाराज करत असलेले दावे फोल असल्याचं दिसतं. याकडं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा भावी पिढीला याच गोष्टींचा सामना करावा लागेल. संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि वारकरी संप्रदायातील नेत्यांना याबाबत सद्बुद्धी येवो हीच माऊली चरणी प्रार्थना..

गुरुकुलांमधील वास्तव- शहरात 300 पेक्षा जास्त गुरुकूल आणि धर्मशाळा- एका गुरुकुलात 70 ते 100 विद्यार्थी- एकूण गुरुकुलातील विद्यार्थी संख्या 20 हजारांहून जास्त- एकाही गुरुकुलाची नोंद नगरपालिकेकडे नाही- गलिच्छ वातावरण आणि सकस आहाराचा अभाव- विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता- त्वचेच्या अनेक आजारांमुळे विद्यार्थी त्रस्त

close