‘अजित पवार राजीनामा द्या’,सेना-मनसैनिक ‘पेटले’

April 10, 2013 9:50 AM0 commentsViews: 75

10 एप्रिल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याविरोधात राज्यभरातून निषेध होतं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळगावच्या सभेत अजित पवारांच्या व्यक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. त्यांनंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा हक्क नाही, त्यांची माफी पुरेशी नाही, पवारांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत मनसेचे कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरले. मंुबईत लालबागमध्ये भारतमाता या ठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली. तर दादरमध्ये शिवसेना भवनाबाहेरही मनसेनं निदर्शनं केली. तर तिकडे कोल्हापूरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नाशिकमध्ये मोर्चा

अजित पवारांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी नाशिकमध्येही मनसेनं मोर्चा काढला. प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पवारांनी जनतेचा अपमान केल्यानं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागावी अशी मागणी मनसेनं केली.

कोल्हापुरात निदर्शनं

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोल्हापूरमध्येही उमटले. शहरातल्या भाऊसिंगजी रस्त्यावर करवीर तहसिलदार कार्यालयासमोर मनसेनं जोरदार निदर्शनं केली. तसंच अजित पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं. यावेळी मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. अजित पवार राजीनामा द्या अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. तर दादांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन तीव्र करणार आसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या आंदोलनात महिलांसह मनसेचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिवसेनाही उतरली मैदानात

मनसेपाठोपाठ शिवसेनेनंही अजित पवारांविरोधात आंदोलन केलं. मुंबईत सेना भवन इथं जोरदार आंदोलन करण्यात आलं. काल शिवेसेनेनं काहीशी मवाळ भूमिका घेतली होती. आज मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. एकीकडं विधिमंडळात गदारोळ आणि दुसरीकडं रस्त्यांवर निदर्शनं असे डावपेच शिवसेना वापरत आहे.

close