मनसैनिकांच्या ‘धार’दार आंदोलनावर राज ठाकरे चिडले

April 10, 2013 4:14 PM0 commentsViews: 77

10 एप्रिल

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्या विरोधात आंदोलन करतेवेळी मनसेच्या कार्यकर्त्यांचाही तोल सुटला. मनसे कार्यकर्त्यांनी एका लहान मुलाला बळजबरीनं अजित पवारांच्या फोटोवर लघवी करायला लावली. मनसैनिकांच्या या आघाउपणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराज व्यक्त केली. जी गोष्ट झाली ती घृणास्पद आहे. अशा गोष्टी करणार्‍यांना पक्षात थारा नाही. ज्या कोणी या गोष्टी केल्यात तो पक्षातला कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करणार अशी भूमिका राज ठाकरे यांनी जाहीर केली. तसंच ते कोण आहेत, हे पहावं लागेल. पक्षातले आहेत की पक्षाबाहेरचे ते पाहू असंही राज यांनी स्पष्ट केलं.

उजनी धरणात पाणी सोडावं या मागणी 64 दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर भय्या देशमुख धरणं आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्वाच्य भाषेत टीका केली. 'पाणीच नाही तर मुतता का तिथे' अशा शब्दात पवारांनी खिल्ली उडवली होती. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अखेरीस अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतली ही सगळ्यात मोठी चुकी होती. मला माफ करा अशा शब्दात आपला माफीनामा दिला होता. त्यांचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दिलगिरी व्यक्त केली होती. विधानसभेत विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत दोन दिवसांपासून कामकाज बंद पाडलं. तर जळगावच्या सभेत राज ठाकरे यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. अजित पवारांना पैशाचा माज आहे. येत्या निवडणुकीत मतदार त्यांना मत नाही मूत देतील अशी विखारी टीका राज यांनी केली होती. त्यांची सभा होऊन दोन उलटल्यानंतर मनसैनिकांना अचानक जाग आली आणि त्यांनी आज सकाळी मुंबईसह राज्यभरात निदर्शनं केली. यावेळी राष्ट्रवादीच्या फलकावर अजित पवारांचा फोटो लावून त्यावर एका शाळकरी मुलांला लघवी करायला लावली. त्यांच्या या कृत्यामुळे राज ठाकरे चांगलेच भडकले. कार्यकर्त्यांच्या कृत्यावर राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पण ज्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करणार असं स्पष्ट केलं.

राज ठाकरेंची काय प्रतिक्रिया जी गोष्ट झाली ती घृणास्पद आहे. अशा गोष्टी करणार्‍यांना पक्षात थारा नाही. ज्या कोणी या गोष्टी केल्यात तो पक्षातला कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करणार. ते कोण आहेत, हे पहावं लागेल. पक्षातले आहेत की पक्षाबाहेरचे ते पाहू – राज ठाकरे

close