अनधिकृत बांधकामांना आव्हाडांचं अभय

April 9, 2013 4:13 PM0 commentsViews: 33

उदय जाधव, मुंबई

09 एप्रिल

मुंब्रामध्ये लकी कंपाऊंडमधली अनधिकृत 7 मजली इमारत पडून 74 लोकांचा मृत्यू झाला. याच परिसरातली अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी दीड वर्षापूर्वी वन विभागाचे अधिकारी पोहोचले होते. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वनधिकार्‍यांवर दादागिरी केली आणि अनधिकृत बांधकामं पाडायला विरोध केला. त्यामुळे या परिसरात अनधिकृत बिल्डींग बिनधास्त उभ्या राहिल्या.

शिळफाटा परिसरात ही इमारत कोसळून 74 जणांचे बळी गेले, तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ताबडतोब स्पष्ट केलं की, ते त्या भागातले आमदार नाहीत. पण आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या या कागदपत्रांवरून नवा गौप्यस्फोट होतोय. या गोठेघर आणि डायघर परिसरातली अनधिकृत बांधकामं वन जमिनीवर आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार ही बांधकामं तोडण्यासाठी वनअधिकारी 13 जून 2011 रोजी गेले होते. पण राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही लोकांसोबत वनधिकार्‍यांना विरोध केला. एवढंच नाही तर त्यांना दमदाटी आणि शिवीगाळही केला आणि अनधिकृत बांधकामं तोडण्यापासून रोखलं. ही सर्व माहिती वनधिकार्‍यांनीच राज्याच्या मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार केलीय. त्याची प्रत आयबीएन लोकमतच्या हाती आहे.

पण आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप मान्यच केले नाहीत.. तर त्यांचं समर्थनही केलं. सत्ताधारी पक्षच सरकारी यंत्रणेच्या विरोधात गेल्यामुळे वनमंत्री अडचणीत आले आहे.

मुंब्रा परीसरातील नव्वद टक्यांहुन अधीक बांधकामं ही अनधिकृत आहेत. अशी बांधकामं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आशिर्वादाने आजही सुरू आहेत. मतांच्या जोगव्यासाठी अशी अनधीकृत बांधकामं मात्र सर्वसामान्य रहिवाशांची कबर बनतायेत.

लकी कंपाऊड मधल्या दुर्घटनेत राष्ट्रवादी नगरसेवकासह नऊ जणांना अटक झाली. अशा धोकादायक बांधकामांना अभय देऊन स्थानिक आमदार आपल्या मतदारांची मदत करत आहेत की, त्यांचे जीव धोक्यात टाकत आहेत. याचं उत्तर या कोसळलेल्या इमारतीवरून स्पष्ट होतंय.

close