मराठी नवं वर्षाचं जल्लोषात स्वागत

April 11, 2013 8:01 AM0 commentsViews: 8

11 एप्रिल

गुढीपाडवा अर्थात चैत्रपाडवा… म्हणजे मराठी नववर्ष… साडे तीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त… या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. काठीला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ आणि साखरेची गाठी बांधून तयार केलेली ही गुढी घरावर उंच लावून आनंद साजरा करतात. गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबईत डोंबिवली, गिरगाव, विलेपार्ले इथं शोभायात्रा काढण्यात आल्यात. तर पुणे, नाशिक, रत्नागिरीतही मोठ्याप्रमाणात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला.

रावणाचा वध करून राम आजच्याच दिवशी अयोध्येत परतले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. तसंच याच दिवशी शालिवाहनानं शत्रूंवर विजय मिळवला आणि शालिवाहन शकाला सुरुवात झाली. आणि आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, असंही सांगितलं जातं. त्यामुळेच आजचा दिवस नवचैतन्याचा, नवनिर्मितीसाठी अत्यंत योग्य असा मानला जातो. गुढी उभारून, झेंडुच्या फुलांची तोरणं आणि आंब्यांच्या डहाळ्या लावून चैत्र महिन्याचं स्वागत केलं जातं.

close