शरद पवारांनी सुनावले दादांना खडे बोल

April 13, 2013 11:22 AM0 commentsViews: 48

13 एप्रिल

अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणावर मौन सोडलं. अजित पवारांचं भाषण अनुचित होतं.त्यांची भूमिका चुकीची आणि अयोग्य आहे. मोठ्या पदावर बसलेल्या माणसानं असं बोलायला नको. त्यांच्या राजीनाम्याबाबत आमदार निर्णय घेणार नाही तर पक्ष पातळीवर याचा निर्णय घेतला जाईल असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना चांगलंच फटकारलंय. त्याचबरोबर एकदा माफी मागितल्यानंतर त्याला पूर्णविराम द्यायला हवा असंही ते म्हणाले. यापुढच्या काळात अजित पवारांनी अधिक काळजी घ्यायला हवी असा सल्लाही त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये झालेल्या सभेत दुष्काळग्रस्तांची अर्वाच्य भाषेत टर उडवली होती. पाणीच नाही तर मुतता का तिथे ? अशा अर्वाच्य भाषेत पवारांनी आंदोलकांची खिल्ली उडवली होती. पवारांच्या या वक्तव्यांचे राज्यभरात पडसाद उमटले होते. विरोधकांनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली होती. आपल्या राजकीय कारकिर्दीतली ही सगळ्यात मोठी चूक होती, मला माफ करा असा माफीनामा अजित पवारांनी विधानसभेत सादर केला होता. मात्र विरोधकांनी माफी नको, राजीनामा द्या अशी मागणी लावून धरत शिवसेना -मनसेनं राज्यभरात निदर्शनं केली. विरोधकांच्या या मागणीवर भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही. पण राजीनाम्याच्या प्रश्नावर सहकारी आमदारांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. खुद्द पक्षश्रेष्ठींना डावलून आमदारांशी चर्चा करणाच्या उद्गारमुळे अजित पवारांनी वेगळेच संकेत दिले. अखेरीस खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतण्याचे चांगलेच कान उपटले. अजित दादांचं भाषण हे अनुचित, अयोग्य होतं. सत्तेत मोठ्या पदावर असताना असं विधान करणे चुकीचे आहे. याबाबत विधानसभेत त्यांनी जाहीर माफी मागितली होती. एखाद्या व्यक्तीला आपली चूक कळल्यानंतर त्यांने माफी मागितल्यावर त्या प्रकरणाला पूर्णविराम दिला पाहिजे. राहिला प्रश्न अजित पवारांच्या राजीनाम्याचा तर याबाबत आमदार निर्णय घेणार नाहीत. तर पक्ष निर्णय घेईल. याबाबतीत पक्षाचे धोरण, जेष्ठ नेते याबाबत निर्णय घेईल. आमदारांशी चर्चा करणे गैर नाही पण निर्णय हा पक्षच घेईल असं सांगत शरद पवारांनी अजितदादांना चांगलेच फटाकारले.

close