‘राजीनाम्याचा निर्णय आमदारांशी चर्चा करून घेऊ’

April 11, 2013 10:05 AM0 commentsViews: 8

11 एप्रिल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून विधिमंडळाचं कामकाजही होऊ दिलं नाही. आणि याच गदारोळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पहिल्यांदाच या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. राजीनाम्याबाबत आपण आमदारांशी चर्चा करून मगच निर्णय घेऊ असं पवार यांनी म्हटलंय. मी सभागृहात आणि बाहेर माफी मागितली त्यामुळे विरोधकांनी आता जास्त ताणून धरू नये असं आवाहनही अजित पवारांनी केलं. तर अजित पवारांच्या बेताल वक्तव्यानंतरही शरद पवार गप्प का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. उजनी धरणात पाणी सोडण्यात यावे यामागणीसाठी मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करणार्‍या आंदोलकांनी अजित पवारांनी अर्वाच्य भाषेत थट्टा उडवली होती. त्याच्या या बेताल वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र निषेध कऱण्यात येतोय. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अजित पवारांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली .तर अजित पवारांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहात माफी मागितली मात्र विरोधकांचे एवढ्यावर समाधान झाले नाही. अजित पवार माफी नको, राजीनामा द्या अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. बुधवारी या प्रकरणी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निदर्शनं केली. अखेरीस राजीनाम्याबाबत अजित पवारांनी आमदारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.

close