कल्याणमध्ये मनसे आमदाराचीही शाळा अनधिकृत !

April 17, 2013 4:45 PM0 commentsViews: 162

17 एप्रिल

मनसेचे डोंबिवली ग्रामीणचे आमदार रमेश पाटील यांनी डोंबिवली इंटरनॅशनल स्कूलची इमारत अनधिकृत पद्धतीनं बांधली आहे. एमआरटीपी अंतर्गत सध्या रमेश पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण मॅजिस्ट्रेट कोर्टात सध्या सुनावणीसाठी प्रलंबित आहे. डोंबिवली इंटरनॅशनल स्कूलची ही इमारत दोन मजल्यांची आहे. पण यासाठी एमएमआरडीएकडे मंजुरीसाठी अर्ज केल्याचा दावा रमेश पाटील करत आहेत. शिवाय पाच मजल्याचं शोरुम कोळे परिसरात बांधत आहेत. शोरुमसाठीही रमेश पाटील यांनी परवानगी घेतलेली नाही. पण रमेश पाटील यांच्या शाळेला आणि शोरुमला वीज आणि पाण्याची पुरवठा करण्यात आला आहे.

कल्याण कोळे गावात मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी अनधिकृत शाळा बांधली. या प्रकरणी 20 ऑक्टोबर 2010 साली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता हे प्रकरण मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. दोन मजल्याची ही डोंबिवली इन्टरनॅशनल स्कूल आहे. ज्युनिअर केजी ते सातवी अशी ही शाळा आहे. प्रत्येक वर्गात तीस विद्यार्थी आहेत. प्रत्येकी चाळीस हजार रुपये फी या शाळेत घेतली जाते. कल्याण डोंबिवली महापालिकेतून या सत्तावीस गावांना वगळण्यात आल्यानं प्लॅनिंग ऍथोरीटी एमएमआरडीए आहे. एमएमआरडीएकडे प्लॅन पास करण्यासाठी अर्ज केल्याची माहिती रमेश पाटील यांनी दिली. मात्र त्यावर एमएमआरडीएचा प्रतिसाद न आल्यानं शाळा सुरु केल्याचा दावा रमेश पाटील यांनी केला. रमेश पाटील यांच्या अनधिकृत बांधकामाचा विषय शाळेपुरता मर्यादीत नाही. तर पाच मजल्याचं शोरुम कोळे परिसरात रमेश पाटील बांधतायत. या शोरुमसाठीच्या प्लॅनची मंजुरी सुद्धा रमेश पाटील यांनी एमएमआऱडीएकडुन घेतलेली नाही. कायद्याप्रमाणे जोपर्यंत प्लॅन पास होत नाही आणि बांधकामाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत वीज आणि पाणीपुरवठा महापालिकेला करता येत नाही. मात्र रमेश पाटील यांच्या शाळेला आणि शोरुमला दोन्ही ठिकाणी वीज आणि पाण्याचा पुरवठा झालाय. एकीकडे सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामावर करवाई होतेय. तर आमदार महोदयांच्या अनधिकृत बांधकामावर का कारवाई होत नाही असा सवाल आता जनता विचारतेय.

close