मेडिकल यंत्रसामग्री खरेदीत 100 कोटींचा गैरव्यवहार

April 15, 2013 5:11 PM0 commentsViews: 34

आशिष जाधव, मुंबई

15 एप्रिल

राज्यातल्या 14 शासकीय मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटलसाठी करण्यात आलेल्या यंत्रसामुग्री खरेदीत 100 कोटीहून अधिक रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. ही यंत्रसामुग्रीची खरेदी बाजारभावापेक्षा कितीतरी जास्त दरानं खरेदी केली गेली. माहितीच्या अधिकारा अंतर्गत हा घोटाळा उघड झालाय.

राज्यातल्या एकूण 14 शासकीय मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटलसाठी वैद्यकीय शिक्षण खात्यानं यंत्रसामुग्री खरेदी केलीय. त्यात मुंबईतलं जे जे हॉस्पिटल, पुण्यातलं ससून हॉस्पिटल, नागपूरचं इंदिरा गांधी शासकीय हॉस्पिटल, तसंच औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, धुळे, लातूर, सोलापूर, नांदेड, मिरज आणि अंबाजोगाई या हॉस्पिटलचा समावेश आहे. 2008 ते 2012 या कालावधीत एकूण 299 कोटी 97 लाख रूपयांची यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली. पण या खरेदीत 100 कोटीहून अधिक रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय.

माहितीचा अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये ऑर्थोपेडिक्स उपचारासाठीच्या मशिनरी, पेडियाट्रिकच्या मशिनरीज, मेडिकोलॉजी, मायक्रोबायालॉजी यासाठी उपकरणं खरेदी करण्यात आली. तसंच प्रसुतीसाठी आणि मोठ्या ऑपरेशनसाठी लागणार्‍या मशिन्स आणि उपकरणं, रेफ्रिजिरेटर्स असे 1,250 नग खरेदी करण्यात आले. त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च झाले. सरकारी कागदपत्रं आणि कंपन्यांच्या कोटेशन्सच्या तपशीलावरुन वैद्यकीय शिक्षण खात्यानं अव्वा सव्वाच्या दरानं ही खरेदी केल्याचं स्पष्ट होतंय.

ही खरेदी सरकारी अधिकारी आणि एजंटांच्या संगनमतानं झालीय. या पूर्वीसुद्धा अशा प्रकारचे आरोप वैद्यकीय शिक्षण खात्यावर झाले आहेत.

सर्वसामान्यांना उपचार करण्यासाठी महागडी यंत्रसामुग्री विकत घेतल्याचा आव आणायचा आणि त्याबदल्यात सरकारी तिजोरीवर हात साफ करायचा, असा हा प्रकार आहे.

close