बिल्डराविरोधात उपोषणात मेधा पाटकरांची प्रकृती खालावली

April 12, 2013 12:04 PM0 commentsViews: 15

12 एप्रिल

मुंब‍ई : गेल्या दहा दिवसांपासून बिल्डरांच्याविरोधात उपोषण करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पण मेधा पाटकरांनी वैद्यकीय तपासणीला नकार दिला आहे. सांताक्रूझच्या गोळीबार नगरात बिल्डरांविरोधात हे उपोषण सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मेधा पाटकर समर्थकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यासमोर निदर्शनं केली. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर या मुद्दयावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेधा पाटकर यांनी उपोषण मागं घ्यावं यासाठी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्य अरुणा रॉय यांनी केली. सोनिया यांना पत्र लिहून अरुणा रॉय यांनी ही विनंती केली. या प्रकरणात लोकशाही मूल्ये आणि मेधा पाटकरांची खालावणारी प्रकृती यामुळे आपण ही विनंती करत असल्याचं रॉय यांनी या पत्रात म्हटलं आहे.

मेधा पाटकरांच्या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत ?

- मुंबईतल्या 6 एसआरए प्रकल्पांची गृहनिर्माण प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जी चौकशी समिती नेमलीय. तिचा अहवाल येईपर्यंत या प्रकल्पांच्या झोपड्या जमीनदोस्त करण्याचं काम थांबवावं- राजीव गांधी आवास योजना लागू करावी. त्यामुळे स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्यानं लोक स्वत:च पूनर्वसन करू शकतील- अजय माकन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून झोपड्या जमीनदोस्त करण्याचं काम थांबवायला सांगितलं होतं, त्यांच्या निर्देशांचं पालन करावं- गोळीबारमधल्या गणेशकृपा सोसायटीच्या झोपड्या जमीनदोस्त करण्याचं काम बेकायदेशीर आहे. यात 180 कुटुंबांनी परवानगी दिली नसतानाही झोपड्या जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे ते त्वरीत थांबवावं

close