आठवड्याभरात 5 अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी !

April 22, 2013 4:45 PM0 commentsViews: 44

मुंबई (22 एप्रिल 13): देशभरात बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढच होतेय. चिमुरड्या मुली नराधमांचे लक्ष्य ठरतायत. गेल्या आठवडाभरात दिल्ली, मध्यप्रदेश आणि नागपूरमध्ये 4 ते 5 वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर बलात्कार झालेत. तर महाराष्ट्रातही गेल्या दोन दिवसात बलात्काराच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. मुंबई ते नागपूर संपूर्ण राज्यभरातून अशा बातम्या येताहेत. यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे लहान मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार… हे अत्याचार रोखण्याचं मोठं आव्हान सरकार आणि पोलिसांसमोर आहे.

4 वर्षांची ही चिमुरडी शिकण्यासाठी म्हणून राजस्थानहून आपल्या आजीच्या घरी नागपूरला आली. पण, 17 वर्षांच्या तिच्या मामेभावानंच तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झालाय.

दुसरीकडे, नागपुरातल्या केअर हॉस्पिटलमध्ये गेल्या 3 दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. मध्यप्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातल्या घनसौरमध्ये तिच्यावर बलात्कार करून तिला स्मशानभूमीत फेकून देण्यात आलं. तिच्या मेंदूला गंभीर दुखापत ती व्हेंटिलेटरवर आहे. तिचं ब्लडप्रेशरसुद्धा अनेक औषधं देऊन सामान्य ठेवलं जातंय.

लहान मुलीवरच्या बलात्काराची आणखी एक घटना पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेरमध्ये घडली. इथं 14 वर्षांच्या मुलीवर तिच्या वर्गातच बलात्कार करण्यात आला. 10 वीच्या ट्युशनसाठी म्हणून ही मुलगी श्री दत्त विद्यालयात गेली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाला. या प्रकरणी पोलिसांनी 20 वर्षांच्या आरोपीला अटक केलीय.

डोंबिवलीमध्ये घडलेला प्रकार तर अत्यंत धक्कादायक आहे. नवर्‍याचे दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध आहेत हे कळल्यावर ममता निषाद नावाच्या महिलेनं 19 वर्षांच्या त्याच्या प्रेयसीवर सामूहिक बलात्कार घडवला.

या सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे तर दाखल झालेत. पण, गरज आहे ती दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्याची…

close