किक्रेटचा ‘देव’ धावला आदिवासींच्या मदतीला !

April 24, 2013 10:54 AM0 commentsViews: 49

दीप्ती राऊत, नाशिक

नाशिक (24 एप्रिल) : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस हा तसा क्रीडा प्रेमींसाठी राष्ट्रीय सण असतो…पण जल्लोषाच्या या माहोलमध्ये सचिननं आपल्यातील सामाजिकतेचं भान आवर्जुन जपलंय. आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्यानं निवडलं ते आयबीएन लोकमतचं व्यासपीठ..आयबीएन लोकमतसह वाढदिवस साजरा करण्याची सचिननं आता हॅट्‌ट्रीक केली. पण यावेळचा वाढदिवस हा खास आहे..आणि त्याला कारणही तसंच आहे. मैदानावर आपल्या बॅटींगनं चाहत्यांच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार्‍या सचिनंनं यंदा धाव घेतीलये ती दूर खेड्यापाड्यात…

वेळुंजे…डोंगराच्या खोर्‍यात वसलेलं… जंगलाच्या दाटीत लपलेलं… कोणतंही आदिवासी खेडं असावं असंच हे गाव. कारवीच्या भिंती, कौलारु छतं आणि वर्षानुवर्षाचं गांजलेपण… नाशिकपासून अवघ्या 50 किलोमीटरवर असलेलं हे वेंळुंजे गाव…अठरा विश्व अंधार त्यांच्या पाचवीलाच पुजलेला… दिवस मावळला की गावात असतं ते फक्त मिट्ट काळोखाचं साम्राज्य…

ठिकठिकाणी अर्ज करुन, नेतेमंडळींना विनंती करुनही गावकर्‍यांच्या वाट्याला आला तो फक्त अंधार..वीज त्यांच्यापर्यंत कधी पोहचलीच नाही. येथील आदिवासींना सरकार दरबारी अनेक वेळा मागणी केली. आमदारांना साकडं घातलं मात्र वीज काही आली नाही.

पण म्हणतात ना, 'भगवान के घर देर है अंधेर नहीं.' अचानक गावचं चित्र पालटलं. कौलारू छतावर सोलारचं पॅनल बसलं. कारवीच्या मांडवात सोलारचा बल्ब लटकला आणि चुलीजवळचा अंधार हटला. लखम्याचा अभ्यास रात्री उशीरापर्यंत होऊ लागला.

आता आमची पोरं अभ्यास करतात. बाहेर झोपलो तरी सापविंचवाची भीती वाटत नाही असं सांगणार्‍या आदिवासींच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसडून वाहत होता. सोलारच्या या दिव्यांनी वेळूंजेच्या या आदिवासी पाड्यांवर आशेचा प्रकाश आणला. पण त्यांना माहीत नाही, या प्रकाशाचा स्रोत कोण आहे.

close