‘अजित पवारांचं आत्मक्लेश नाटक,राजीनामा द्या’

April 15, 2013 10:13 AM0 commentsViews: 10

15 एप्रिल 2013

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला. अजित पवारांचं आत्मक्लेश म्हणजे नाटक असल्याची टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. आणि अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. या गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अजित पवारांच्या समर्थक आमदारांनीही सभागृहात घोषणाबाजी केली. उमुपख्यमंत्री अजित पवारांचा माफीनामा आणि प्रीतिसंगमावर घेतलेलं प्रायश्चित या पार्श्वभूमीवर आज पुन्हा विधीमंडळाचं शेवटच्या आठवड्याचं कामकाज सुरु झालं. मात्र, विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याचा मु्‌द्दा उपस्थित केला. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली आणि प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चेची मागणी केली. या गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. गेले आठवडाभर अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी कामकाज रोखून धरलं होतं. तर अजित पवारांनी दोनदा माफी मागितल्यानं आता विषय संपला असं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्टं केलंय. तसंच त्यांनी अजित पवारांना फटकारल्यानंतर अजित पवारांनी प्रायश्चित्त करत आत्मक्लेश केलं. त्यामुळे विरोधक पुन्हा आक्रमक झालेत. आज अर्थसंकल्पीय मागण्यांच्या मंजुरीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं सरकारला कोणत्याही परिस्थितीत कामकाज रेटून न्यायचंय. अशा वेळी सरकारबरोबरच विरोधकांची कसोटी लागणार आहे.

close