बॉम्बस्फोटाने अमेरिका हादरली, 3 ठार

April 16, 2013 12:59 PM0 commentsViews: 20

16 एप्रिल 13

9 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेवर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला आणि आता तब्बल 12 वर्षांनंतर अमेरिका पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. अमेरिकेतल्या सर्वात जुन्या मॅराथॉनपैकी एक असलेली बोस्टन मॅराथॉन सुरू असताना दोन बॉम्बस्फोट झाले. त्यात तीन जण ठार आणि 176 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 17 जणांची प्रकृती अत्यव्यस्थ आहे तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे मॅराथॉन संपत असताना म्हणजे जेव्हा फिनीश लाईनजवळ खेळाडू आणि प्रेक्षकांची सर्वात जास्त गर्दी असते, अशा वेळी हे बॉम्बस्फोट करण्यात आलेत.

एक बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आलं. या हल्ल्याची जबाबदारी अजून कुठल्याही अतिरेकी संघटनेनं घेतलेली नाही. पण हा दहशतवादी हल्ला आहे, असं अमेरिकी प्रशासनानं जाहीर केलंय. या हल्ल्यामागे अमेरिकेतल्या कट्टरतावाद्यांचा हात आहे की, बाहेरच्या कुणी हा हल्ला केला, याचा तपास सध्या सुरू आहे. हा हल्ला कुणी केला याची ठोस माहिती नसली तरी एक व्यक्ती पाठीवर काळी बॅग घेऊन जात होती. त्यानंच हे स्फोट घडवल्याचा संशय आहे. त्याचा शोध तपास संस्था घेत आहेत. ज्यांनी हे कृत्य केलं त्याला पकडण्यात येईल, असं आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलंय.

चिमुरड्याचा मृत्यू

या अतिरेकी हल्ल्यात एका 8 वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. न्यूटनमधल्या सॅडीहूक शाळेतल्या गोळीबारात दगावलेल्या मुलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा मुलगा मॅराथॉनमध्ये सहभागी झाला होता. या मॅराथॉनमध्ये तब्बल 23 हजार जणांनी सहभाग घेतला होता. या मॅराथॉनचं हे 117 वं वर्षं होतं. अमेरिकेतल्या पहिल्या क्रांतीयुद्धामध्ये शहीद झालेल्यांच्या स्मृतीप्रितर्थ आजच्या दिवशी बोस्टनमध्ये पॅट्रीऑट्स डे म्हणजेच देशभक्त दिन साजरा केला जातो. या दिवशी इथे सुटी असते आणि या मॅराथॉनचं आयोजन केलं जातं.

हा भेकड आणि निर्बुद्ध हल्ला -पंतप्रधान

अमेरिकेतल्या या बॉम्बस्फोटांचा जगभरातल्या नेत्यांनी कठोर शब्दात निषेध केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या घटनेचा निषेध केला. हा भेकड आणि निर्बुद्ध हल्ला असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तर एका प्रतिष्ठित आणि जगभर नावाजलेल्या मॅराथॉनदरम्यान झालेल्या या क्रूर हल्ल्याचा आपण निषेध करतो असं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी म्हटलं आहे.

हल्ला कोणी केला ?बोस्टन मॅरेथॉनवरचा हा हल्ला नेमका कोणी केला असेल, त्यामागचा सूत्रधार कोण, याचा शोध घेणं FBI या अमेरिकेच्या शक्तीशाली तपास यंत्रणेलाही शक्य होत नाहीये. पण, नेमका हा हल्ला कोणी केला असेल याबद्दलची काही नावं जगभर घेतली जात आहे.

- ऍडम याह्या गॅडाहन… हा मूळचा ऍडम पर्लमन… अमेरिकेतल्या ओरेगॉन या राज्यात त्याचे वडील फील पर्लमन संगीतकार म्हणून काम करत. जिहादींच्या संपर्कात आल्यावर त्याने आपलं नाव बदललं. सध्या हा पाकिस्तानात आहे आणि त्याच्या डोक्यावर दहा लाख डॉलरचं वक्षीस अमेरिकेने जाहीर केलंय. असा हा आत्ताचा ऍडम याह्या गॅडाहन अमेरिकेच्या यंत्रणांना धोकायदायक वाटतो. ऍडम सारखे अनेक जण हे असे जिहादी आहेत जे अमेरिकेच्या भूमीत जन्मलेत. त्यामुळे, देशात किवा बाहेर प्रवास करताना त्यांना फारशी अडचण येत नाही.

- पण, संशय केवळ या नव्या जिहादींवरच नाही. तर, 9/11 नंतर अमेरिकेत नाझी विचार मानणारा नवा वर्ग आणि वर्चस्ववादी श्वेतवर्णियांचाही एक वर्ग मोठ्या प्रमाणावर उदयाला आलाय. त्यांनी केलेल्या हिंसाचारामध्ये जवळपास 253 जण मारले गेले आणि 1,526 जण जखमी झालेत. नव्या जिहादींकडून झालेल्या हिंसाचारापेक्षा हा हिंसाचार तुलनेने अधिक आहे. अमेरिकन सरकारनेही या वर्चस्ववादी श्वेतवर्णियांना अत्यंत धोकादायक दहशतवादी म्हटलंय.

close