ओमर अब्दुल्ला काश्मीरचे नवे मुख्यमंत्री

December 30, 2008 7:41 AM0 commentsViews:

30 डिसेंबरजम्मू कश्मीरमध्ये,नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे युती केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी यासंदर्भात दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. यानंतर ही घोषणा करण्यात आली. ओमर अब्दुल्ला काश्मीरचे नवे मुख्यमंत्री असतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला 28 जागा मिळाल्यात. तर काँग्रेसला 17 ठिकाणी यश मिळालं आहे. ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे सर्वात तरुण मुख्यमंत्री असतील. वाजेपायी मंत्रीमंडळात त्यांनी काही वर्ष मंत्रीपद सांभाळलं आहे. काँग्रेसबरोबर ओमर अब्दुल्ला यांचे खूप चांगले संबंध आहेत. राहुल गांधी आणि त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे. राहुल गांधी यांनीच ओमर अब्दुल्ला यांच्या नावाचा आग्रह धरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसचं त्यांना चांगलं सहकार्य मिळेल असं मानलं जात आहे. मात्र त्याचवेळी अमरनाथ जमीनीचा मुद्दा उकरून काढत जम्मूमध्ये घवघवीत यश मिळवलेला भाजप आणि काश्मीरमध्ये नेमक्या याच मुद्द्याचा विरोधात वापर केलेल्या पीडीपी या विरोधा बाकांवर बसणार्‍या दोन प्रबळ विरोधकांचा सामना त्यांना करावा लागेल.खरं तर मुख्यमंत्रीपदासाठी फारुख अब्दुल्ला यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र पूर्ण बहुमत मिळालं नाही, तर मी मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, असं फारुख अब्दुल्ला यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. राज्याला तरुण नेतृत्वाची गरज असल्याचं सांगत त्यांनी ओमर अब्दुल्ला यांना पुढे केलं आहे. यामुळे फारुख अब्दुल्ला यांचा राष्ट्रीय राजकारणातला मार्गही मोकळा झाल्याचं मानलं जात आहे.

close