कोलकाताला पराभवाचा धक्का, पंजाबचा विजय

April 16, 2013 4:36 PM0 commentsViews: 6

16 एप्रिल

आयपीएलमधल्या बलाढ्य चेन्नई सुपरला हरवण्याची करामत पुणे वॉरियर्सने केली आणि आज आणखी एका बलाढ्य टीमला तळाच्या टीमकडून पराभूत व्हावं लागलंय. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला किंग्ज इलेव्हन पंजाबनं पराभवाचा धक्का दिला. चुरशीच्या लढतीत पंजाबने कोलकाताचा 4 रन्सने पराभव केला. मनदीप सिंग आणि मनप्रीत गोणीनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबनं 157 रन्स केले. याला उत्तर देताना कोलकाता नाईट रायडर्सला 9 विकेट गमावत 153 रन्स करता आले. कॅप्टन गौतम गंभीरने हाफसेंच्युरी करत विजयासाठी झुंज दिली. तर रजत भाटीयानं शेवटच्या ओव्हर्समध्ये 2 सिक्स मारत रंगत निर्माण केली. पण अखेर टीमला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

सुनिल नरिनची हॅट्‌ट्रीक

आयपीएलच्या सहाव्या हंगामातल्या पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद झाली. कोलकाता नाईट रायडर्सचा हुकमी बॉलर सुनिल नरिनच्या नावावर हॅट्ट्रिक जमा झाली. मॅचच्या 15 व्या ओव्हरमध्ये नरिनने डेव्हिड हसीला आऊट करत पहिल्या विकेटची नोंद केली. पुढच्याच बॉलवर त्यानं अझहर मेहमूदचा आपल्याच बॉलिंगवर कॅच घेतला. त्याची तिसरी विकेट होती, गुरकिराट सिंग.. गुरकिराट सिंगला क्लिन बोल्ड करत नरिननं हॅटट्रिक साजरी केली. नरिननं 4 ओव्हरमध्ये 33 रन्स देत 3 विकेट घेतल्या. याबरोबरच त्यानं यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणार्‍या बॉलरच्या यादीतही अव्वल स्थान पटकावलंय. नरिनच्या खात्यात आता 5 मॅचमध्ये 10 विकेट जमा झाल्यात.

close