हिमायत बेगला फाशी

April 18, 2013 11:50 AM0 commentsViews: 24

18 एप्रिल

पुण्यात जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या अतिरेकी हिमायत बेगला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेगला सोमवारी पुणे सेशन्स कोर्टानं दोषी ठरवलं होतं. हिमायत बेग कटात सहभागी असल्याचा आरोप सिध्द झाला. आज त्याला पुणे सेशन्स कोर्टासमोर हजर करण्यात आले यावेळी कोर्टाने हिमायतवर दहशतवादी कारवाई अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टात हिमायतने आपण निर्दोष असून मला या प्रकरणात गोवण्यात आलं असं दावा केला. मात्र कोर्टाने त्याचा दावा साफ फेटाळून लावला. कोर्टाच्या या निर्णयावर स्फोटातील पीडितांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच या स्फोटामागील खर्‍या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी तरच आम्हाला खरा न्याय मिळेल अशी भावनाही व्यक्त केली.

13 फेब्रुवारी 2010.. संध्याकाळी सातच्या सुमाराला पुण्यातल्या जर्मन बेकरीमध्ये स्फोट झाला. पुण्यावर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला. यात 17 जणांचा मृत्यू झाला, तर तर 64 जण जखमी झाले. स्फोटानंतर काही महिन्यांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या हिमायत बेगला पुण्यात अटक करण्यात आली. दुसरा आरोपी जबिबउद्दीन अन्सारी याला 26/ 11 प्रकरणी पोलिसांनी अटक केलीय. हिमायतनं केलेला श्रीलंकेचा दौरा आणि सापडलेले इतर पुरावे याच्या आधारे तब्बल 2,500 पानी चार्जशीट पोलिसांनी तयार केलं होतं. 11 मार्चला या प्रकरणातली शेवटची साक्ष झाली आणि त्यानंतर सोमवारी न्यायमूर्ती पी एन धोटे यांनी हिमायतला दोषी ठरवलं.

गुन्हेगारी कट रचणं, दहशतवादी कारवाया, बॉम्बस्फोट कटात सहभागी, स्वतःकडे आरडीएक्स बाळगणं, बनावट कागदपत्रं तयार करणं, प्रक्षोभक भाषणं करणं, सदोष मनुष्यवध, खून हिमायत बेगला या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आलंय. या प्रकरणामध्ये भटकळ बंधुंसह इतर पाच आरोपी अजूनही फरार आहेत.

हिमायत बेगने काय केलं?- हिमायत बेग याने 31 जानेवारीला जर्मन बेकरीची रेकी केली होती.- कटाच्या बैठकीसाठी त्यानं इतर आरोपींना उद्गीरमध्ये जागा उपलब्ध करून दिली.- बॉम्ब ठेवण्यासाठीची बॅगही बेगने आणली होती.- बॉम्बस्फोटासाठी ज्या नोकिया फोनचा वापर करण्यात आला तो मोबाईलही बेगनेच विकत घेतला होता- कट रचण्यामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता

close