‘अभद्र युती’चा ‘ठाणे बंद’बद्दल माफीनामा,आता मोर्चा काढणार !

April 19, 2013 10:57 AM0 commentsViews: 23

19 एप्रिल

ठाणे : अनधिकृत बांधकामांच्या बचावासाठी 'अभद्र युती'ने गुरूवारी ठाणेकरांना वेठीस धरत 'ठाणे बंद' यशस्वी करून दाखवला. मात्र हा बंद यशस्वी व्हावा यासाठी अगोदरच अभद्र युतीने फिल्डिंग लावून ठेवली होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे हा बंद यशस्वी झाला. पण या सगळ्याप्रकरणात ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. आपल्या मतदारराजाचे हाल पाहून आज अभद्र युतीच्या नेत्यांनी माफीनामा सादर केला. आम्ही पुकारलेल्या बंदमुळे लोकांचे हाल झाले, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,माफी मागतो अशा शब्दात काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी आपला माफीनामा सादर केला. पण हा माफीनामा सादर करत असताना अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात आंदोलन सुरूच राहिल यासाठी आता आठ मे रोजी ठाणे ते मंत्रालय मोर्चा काढणार अशी घोषणाही अभद्र युतीने केली. आधी पुनर्वसन आणि मगच कारवाई अशी नवीन भूमिका युतीने घेतली आहे.

मुंब्रा इथं अनधिकृत इमारत पडून 74 जणांचे जीव गेले आणि त्यानंतर ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू झाली. या कारवाईला विरोध करत ठाणे बंद पुकारण्यात आला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेनेने एकत्र येऊन बंद पुकारल्यामुळे स्वाभाविकपणे दुकानं आणि रिक्षा बंद होत्या. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांचे अतोनात हाल झाले.

बंद यशस्वी व्हावा.. म्हणून आदल्या रात्रीच टीएमटीच्या 3 बस तसंच 5 रिक्षांची तोडफोड करण्यात आली. तसंच 10 बसेसची हवा काढण्यात आली. त्यामुळे सिटी बसेस तुरळक धावत होत्या. तर दुसरीकडे.. टीएमटीच्या बसेस जास्त सोडाव्यात या मागणीसाठी मनसेनं परिवहन व्यवस्थापकाच्या कार्यालयात तोडफोड केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला मनसेने विरोध केला होता.

ठाणे जिल्ह्यातल्या अनेक शहरांना अनधिकृत बांधकामांच विळखा आहे आणि या इमारतींमध्ये हजारो मतदार राहतात आणि त्यांच्या मतांवर डोळा ठेवणार्‍या राजकीय पक्षांनी कायद्याप्रमाणे जगणार्‍या ठाणेकरांना मात्र वेठीला धरलं. आता पुन्हा नव्याने मागणी करत मोर्चा काढणार असं नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. अनधिकृत बांधकामांसाठी बिल्डरांना अभय द्याचा. कारवाई झाली तर बंद त्यांनंतर माफीनामा आणि आता मोर्चा.. नेमकं नेत्यांना इतका पुळका का आला असा सवाल ठाणेकर विचारत आहे.

close