रिव्ह्यु -सहज सुंदर ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं..’

April 19, 2013 4:08 PM0 commentsViews: 248

अमोल परचुरे, समिक्षक

19 एप्रिल

'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..' कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध कवितेतली ही ओळ…पण त्या ओळीच्या शेवटी आहे एक उद्गारवाचक चिन्ह आणि एक प्रश्नचिन्ह…नावाप्रमाणेच ही प्रेमाची गोष्ट आहेच, पण त्याचबरोबर नात्यांची, नात्यांमधल्या गुंत्याची, नात्यांमधल्या तणावाची आणि प्रेमातून येणार्‍या जबाबदारीचीसुध्दा ही गोष्ट आहे. या सिनेमाची कथा लिहिलीय मनिषा कोरडे यांनी आणि दिग्दर्शित केलंय अभिनेत्री मृणाल कुलकर्णीनं, असं जरी असलं तरी हा पूर्णपणे स्त्रीच्या नजरेतून हा सिनेमा बनलेला नाही हे महत्त्वाचं…पहिल्याच दिग्दर्शनात मृणाल कुलकर्णीनं मोठी झेप घेतली आहे असं नक्कीच म्हणता येईल आणि तिला पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांनी उत्तम साथ दिलेली आहे.

चाळीशीतल्या प्रेमाची गोष्ट सांगणारी सिनेमाची ही कथा हळुवार उलगडत जाते आणि तीच या सिनेमाची गंमत आहे. सिनेमातल्या व्यक्तिरेखांची कहाणी उलगडत असताना प्रेक्षकही त्यात गुंतून जातो आणि हे गुंतणं शेवटपर्यंत टिकून राहतं हे सिनेमाचं आणि पर्यायानं लेखक-दिग्दर्शकाचं यश म्हणायला हवं. एखाद्या डेली सोपला शोभेल असा हा विषय, पण त्याच विषयाला अडीच तासात बांधण्याचं कठीण आव्हान यशस्वीपणे पेलण्यात आलंय. इथं कथा सांगून तुमची मजा आम्ही घालवणार नाही. पण, यातल्या विषयाचा आवाका मोठा आहे. एकाच जोडप्याविषयी किंवा एकाच घरापुरता नाही तर समाजात सध्या विवाहविषयक ज्या ज्या गोष्टींवर चर्चा सुरु आहे. त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यात करण्यात आलाय, महत्त्वाचं म्हणजे हे सगळे प्रश्न सिनेमात कथेसोबत येतात…कुठेही भाषणबाजी नाही, किंवा निरर्थक संवाद नाहीत किंवा आपण काहीतरी प्रेमाची थिअरी मांडतोय असा अविर्भावही नाही..

अमलेंदु चौधरीचा कॅमेरा, शंख राजाध्यक्षचं एडिटिंग या तांत्रिक गोष्टीसुध्दा सरस झाल्या आहेत आणि सगळ्यावर कडी केलीये ती कलाकारांनी. मृणाल कुलकर्णी , सचिन खेडेकर यांचा अभिनय तर खास आहेच पण सुनील बर्वे आणि पल्लवी जोशी चा विशेष उल्लेख करावा लागेल. दोघांचेही रोल्स तसे छोटे आहेत, पण त्यांनी खूपच सुंदर काम केलंय. नेहा जोशी, सुहास जोशी, मोहन आगाशे आणि स्मिता तळवलकर यांनीही सहज अभिनयाचं पुन्हा उदाहरण दिलंय. महत्त्वाचं म्हणजे चार बालकलाकारांनीसुध्दा सहजसुंदर काम केलंय. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं!? रेटिंग – 75

close