रिव्ह्यु – अंधश्रद्धेनं पछाडलेला ‘येडा’ !

April 19, 2013 3:43 PM0 commentsViews: 478

अमोल परचुरे, समिक्षक

19 एप्रिल

माथेफिरु माणसाच्या मनात अंधश्रद्धेनं थैमान घातलं की, तो कोणत्या क्रूर थराला जाऊ शकतो याची गोष्ट म्हणजे 'येडा' हा सिनेमा… 'स सासूचा' या हॉरर सिनेमानंतर किशोर बेळेकर यांचा हा दुसरा सिनेमा. हा दुसरा सिनेमाही हॉरर सिनेमाच्या पठडीतला असला तरी त्याला एक सामाजिक सिनेमाही म्हणता येईल. अंधश्रध्देचे दुष्परिणाम म्हणजे काय ? हे या सिनेमातून आपल्याला दिसतं. मुसळधार पावसात एक बाईकस्वार भरधाव निघालाय. रस्त्यात त्याच्या बाईकला अपघात होतो, त्याचा मोबाईल रस्त्यावर पडलाय आणि तो वाजायला लागतो. त्या मोबाईलवर पडतो एक पाय…अशी आहे सिनेमाची सुरुवात…सिनेमाच्या प्रकृतीचा अंदाज तिथेच येतो. यानंतर इंटरव्हलपर्यंतचा भाग आपल्याला बांधून ठेवतो. फ्लॅशबॅकसारख्या तंत्राचा वापर करत लेखक-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलेलं आहे. सिनेमात माथेफिरु आहे अप्पा कुलकर्णी (आशुतोष राणा)…संशयाने पछाडलेला, अंधश्रध्देनं ग्रासलेला हा अप्पा कुलकर्णी हिंसक बनलाय, ही हिंसा तेंडुलकरी पध्दतीची आहे. इतरांसाठी चूक असलं तरी त्याचं वागणं त्याला स्वत:ला पूर्णपणे पटतंय. आपण करतोय ते योग्यच आहे यावर त्याची ठाम श्रध्दा आहे…ही त्याची मनोवृत्ती शेवटापर्यंत कायम आहे.

'येडा' असं आकर्षक नाव देऊन, अप्पा कुलकर्णीच्या भूमिकेत आशुतोष राणाला घेऊन दिग्दर्शकानं अर्धी लढाई तर जिंकलेली आहेच. आशुतोष राणाचा मनोरुग्ण अवतार 'दुश्मन' आणि 'संघर्ष' सारख्या हिंदी सिनेमात आपण पाहिलेला आहे. इथं मराठीत मात्र त्याचा माथेफिरु बटबटीत न वाटता वास्तवातला वाटतो. अतिशय थंड डोक्याचा हा अप्पा कुलकर्णी रंगवताना आशुतोष राणानेही अभिनयाबरोबरच भाषेवरही मेहनत घेतलेली जाणवते. सिनेमात लोकेशन म्हणून कोकणचा वापर केलाय, म्हणजे सिनेमात कुठेही कोकणाचा उल्लेख होत नाही पण गावाचं नाव आहे वैभववाडी…सिंधुदुर्गमधल्या वैभववाडीजवळ अंधश्रध्देतून घडलेले नरबळींसारखे प्रकार आपल्याला माहित आहेत आणि त्याच भागात या सिनेमाची कथा घडते.

मराठीत भयपट किंवा हॉरर सिनेमा म्हटला की, अजूनही पाठलाग सिनेमाची आठवण होते. त्याअर्थानं भयपटांची मोठी परंपरा मराठीत नाही. पण गेल्या काळापासून ऐक, 'अशाच एका बेटावर' सारख्या सिनेमांमधून नवे प्रयोग झालेले आहेत. पण त्या सर्वात 'येडा' नक्कीच सरस आहे. यात पुन्हा कलाकारांचं योगदानही मोठं आहे. रिमा लागू, किशोरी शहाणे, सतीश पुळेकर, डॉ. प्रज्ञा शास्त्री, अनिकेत विश्वासराव या सर्वांनीच उत्तमच अभिनय केलाय. मुख्य म्हणजे, सिनेमात कुठेही विनोदी ट्रॅक नाही किंवा गाणीही घुसवण्यात आलेली नाही. पूर्णवेळ प्रेक्षकाला एकाच मूडमध्ये ठेवण्याचा हा प्रयत्न सिनेमाला नक्कीच फायदेशीर ठरलाय.

'येडा' ला रेटिंग – 60

close