वाळू उपशामुळे भीमा नदीत अडलं ‘उजनी’चं पाणी

April 19, 2013 4:48 PM0 commentsViews: 79

19 एप्रिल

भीमा नदीच्या पात्रात होत असलेल्या बेकायदा वाळू उपशाचा परिणाम राज्यातल्या दुष्काळासाठी योजलेल्या उपाययोजनांवर पडू लागला आहे. सोलापूरच्या शेतकर्‍यांना दिलासा देत कोर्टाने उजनीतून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यासाठी पुण्याच्या भामा आसखेड आणि आणि आंद्रा धरणातून उजनीसाठी पाणी सोडण्यात आलं खरं…पण हे पाणी सोलापूरपर्यंत पोचायला विलंब लागतोय. कारण, पुण्यातल्या दौंड परिसरातून वाहणार्‍या भीमा नदीच्या पात्रात राजरोसपणे बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. यामुळे नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत.

भामा आसखेड धरणातून उजनीसाठी सोडण्यात आलेलं पाणी या नदीपात्रातल्या खड्‌ड्यांमुळे संथ गतीनं वाहतंय. त्यामुळं उजनी धरणात पाणी पोहचायला विलंब लागतोय. त्यामुळे एकीकडे पाण्याची गतीही मंद झालीय तर दुसरीकडे पाण्याचा प्रवाह देखील बदलला आहे. भामा आसखेड ते उजनी धरण हे अंतर 205 किलोमीटर इतकं आहे. भीमा आसखेडमधून पाणी सोडल्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत साधारणत: सोमवारी 15 एप्रिलच्या मध्यरात्री उजनी धरणात पोहोचेल असा अंदाज पाटबंधारे खात्याच्या खडकवासला पाटबंधारे उपविभाग कार्यालयानं व्यक्त केला होता.

मात्र नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू उपशामुळे पडलेल्या खड्‌ड्यांमुळं या प्रक्रियेत अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे उजनी धरणात पाणी केव्हा पोहेचेल हे सांगणं कठीण आहे. राज्यातला दुष्काळ निसर्गनिर्मित आहे की, मानव निर्मित आहे ? यावर चर्चा झडत मात्र उजनीत वेळेवर पाणी पोहोचत नाही याला कारण मात्र मानव निर्मितच आहे हे अगदी स्पष्ट आहे.

close