कोकणात धरणांना लागली गळती, बळीराजा हवालदिल !

April 20, 2013 10:46 AM0 commentsViews: 33

दिनेश केळुसकर, रत्नाग़िरी

20 एप्रिल

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांत 1972 पेक्षाही दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. तर कोकणात मात्र, मानवनिर्मित दुष्काळाने नागरिकांची होरपळ होतेय. कोकणातल्या धरणांमधलं पाणी गळतीमुळे वाया जातंय. त्यामुळे अनेक गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलीय. धरण बांधकामातला भ्रष्टाचार आणि पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातली बहुतांश धरणं कोरडी पडली आहेत. त्यामुळे बर्‍याच भागातल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

रत्नागिरीमधल्या डेरवण गावातल्या धरणांचं जलाशय आता केवळ डबकं म्हणून उरलंय. 3.23 दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या या धरणाला गेल्या चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गळती आहे. शिवाय धरण बांधून 12 वर्षं झाली तरी कालवे बांधले नसल्यामुळे ना शेती ना पिण्याला पाणी अशी परिस्थिती या भागात आहे.

पाटबंधारे खात्याचं नियोजन नसल्यामुळे हा फटका आम्हाला बसलाय. शिवाय आज 40 ते 50 गावांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. डेरवणलाच, जिथे धरण आहे तिथेच आता पाणी टंचाईची झळ बसली अशी व्यथा प्रकल्पग्रस्त नरेंद्र राजेशिर्के यांनी मांडली.अशीच परिस्थिती कुचांबे गावातल्या या मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची. एफ़ ए कन्स्ट्रक्शनने बांधलेल्या या धरणाची गेल्या पावसाळ्यात झडप तुटून कोट्यवधी लीटर पाणी वाया गेलंय. झडप दुरुस्तीचं हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्पही अद्याप पूर्ण झालेला नाही. या वर्षी तीन टीएमसी पाणी होतं आणि आता जर आपण बघायला गेलो तर अजिबात पाणी नाही. आणि जी खालची गावं आहेत त्यांना अत्यंत. सगळीकडे महाराष्ट्रात दुष्काळ आहे, आपल्याकडेही पाण्याची वानवा आहे, लोकं पाण्यासाठी तडफडतायत. पाटबंधारे खातं असो वा एफ.ए. कन्स्ट्रक्शन असो ह्यांच्या हलगर्जीपणामुळे लोकांना पाण्यासाठी तडफ़डावं लागतंय असा आरोप प्रकल्पग्रस्त संतोष येडगे यांनी केलाय.

गळती आणि जलाशयात साचत चाललेला गाळ यामुळे कोकणातल्या अनेक धरणातल्या पाणीसाठ्यात घट होत चाललीय. त्यामुळे अशी नादुरुस्त धरणं शेतक-यांसाठी निरुपयोगीच ठरत आहे.

अख्खा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण भटकतोय आणि दुसरीकडे दीडशे इंच पाऊस पडणार्‍या कोकणात मात्र निकृष्ट बांधकामामुळे धरणं अशी कोरडी ठाक पडली. सिंचन घोटाळ्याची खरी श्वेतपत्रिका काढायची असेल तर अशा धरणांच्या मुळाशी जायला हवं.

कॅगच्या अहवालात जलसंपदा खात्याच्या कारभारावर कडक ताशेरे ओढण्यात आले. हा कारभार असाच सुरू राहिला तर कोकणातलं सध्याचं फ़क्त साडेतीन टक्के सिंचनही शुन्यावर येण्याचा धोका आहे.

close