महाराष्ट्र पशू वैद्यकीय विद्यापीठातील घोटाळ्याची चौकशी होणार

December 29, 2008 3:44 AM0 commentsViews: 2

29 डिसेंबर, नागपूरप्रशांत कोरटकरमहाराष्ट्र पशू वैद्यकीय विद्यापीठाच्या पद भरतीत योग्य उमेदवारांना डावलून अपात्र लोकांना नोकर्‍या देण्यात आल्या होत्या. यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांची बातमी आयबीएन-लोकमतनं प्रसारित केली होती. या प्रकरणाची राज्य सरकारनं दखल घेतलीय. आणि त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर विधिमंडळाच्या परिसरात अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून राज्यभरातून आलेल्या या पशुवैद्यकीय पदवीधरांचं आंदोलन सुरू होतं. पशू वैद्यकिय विद्यापीठाच्या पद भरती घोटाळा झाला होता. पशू वैद्यकीय विद्यापीठात 750 पदांची भरती करण्यात आली होती. त्यात अनेक पात्र उमेदवारांना डावलल्याचं उघडकीस आलं. त्याकडं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू होतं. शेवटी आयबीएन-लोकमतनं या उमेदवारांच्या अन्यायाला वाचा फोडली. आणि सरकार जागं झालं. आयबीएन लोकमतनं ही बातमी दिल्यानंतर पशुसंवर्धन मंत्र्यांनी तातडीनं त्याची दखल घेतली. आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विधानपरिषदेत घोषणा केली. "नागपूरमध्ये पशू महाविद्द्यालयाचे कुलगुरू निनावे यांनी पदांची भरती करताना अनेक घोटाळे केल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे हाय कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू" असं पशुसंवर्धन राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.सरकारच्या निर्णयामुळे आंदोलकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल सर्व आंदोलकांनी आयबीएन लोकमतचे आभार मानले आहेत.

close