ठाण्यात बिल्डरांनी उभारल्या अनधिकृत 27 इमारती !

April 23, 2013 9:46 AM0 commentsViews: 23

उदय जाधव,ठाणे

ठाणे (23 एप्रिल 13) : मुब्य्रात अनधिकृत इमारत दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. ठाण्यात अनधिकृत इमारतीत तर आहेच पण लोकप्रतिनिधींनीच अनधिकृत बांधकाम करून कळस गाठला आहे. आता ठाण्यात बड्या बिल्डर्सची बेकायदा बांधकामं समोर आली आहे. हिरानंदानी, लोढा, रुस्तोमजी या बड्या बिल्डर्सनी नियम धाब्यावर बसवून बांधकाम केल्याचं उघड झालं आहे.

18 लाख लोकवस्तीचं ठाणे शहर… या शहरात हिरानंदानी, लोढा, रुस्तोमजी या मोठ्या बिल्डर्सनी 22 ते 27 मजल्यांच्या बिल्डिंग उभ्या केल्यात…पण या बिल्डर्सनी ठाणे महापालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा, वाढीव बांधकामं केली आहेत. माहितीच्या अधिकारात आमदार प्रताप सरनाईक यांनी ही अनधिकृत बांधकामं उजेडात आणली आहे.

हिरानंदानी, लोढा आणि रुस्तोमजी या बड्या बिल्डर्सनी केलेलं वाढीव बांधकाम

1) हिरानंदानी बिल्डर्सने माजिवडे येथील मेडोज संकुलात बिल्डिंग क्रमांक 13 चे 14 मजले आणि बिल्डिंग क्रमांक 14 चे 9 मजले वाढीव बांधले आहेत. या वाढीव बांधकामाबद्दल महापालिकेने त्यांना दंड केलेला नाही. कारण हिरानंदानी यांनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचं बांधकाम करून दिल्यामुळे त्यांना ही सवलत दिल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.

2) लोढा बिल्डर्सने माजिवडेमध्ये बिल्डिंग क्रमांक 31 आणि 36 चे 9 मजले वाढीव बांधले. या वाढीव बांधकामाबद्दल लोढा बिल्डर्सला चार कोटी एकोनव्वद लाख छत्तीस हजार तीनशे पंचेचाळीस रुपये दंड केलांय.

3) रुस्तोमजी बिल्डर्सनेही माजिवडेमध्ये बिल्डिंग क्रमांक 12 आणि 13 ला 23002.72 चौ.मी. चं वाढीव बांधकाम केलंय. या वाढीव बांधकामाबद्दल रुस्तोमजी बिल्डर्सला 20 कोटी 95 लाख 87 हजार 621 रुपये महापलिकेने दंड केलाय.

ठाणे शहरात हिरानंदानी, लोढा आणि रुस्तोमजी या बिल्डर्सनी केलेल्या वाढीव बांधकामाबद्दल, महापालिकेने जो दंड आकारला आहे. हा दंड बिल्डर्सनी वाढीव बांधकामं विकून मिळवलेल्या फायद्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे परवानगी नसतानाही वाढीव बांधकामं, ठाणे महापालिकेच्या आशीर्वादाने बिनधास्त उभारले जातात.

ठाणे महापालिका आयुक्त आर.राजीव यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच हिरानंदानी, लोढा आणि रुस्तोमजी या बिल्डरांनीही या वादग्रस्त विषयावर बोलण्यास नकार दिला. आधी वाढीव अनधिकृत बांधकामं करायची आणि नंतर किरकोळ दंड भरून हीच बांधकामं नियमित करून घ्यायची. ठाणे महापालिकेच्या या अनधिकृत नियमांमुळेच ठाणे शहर आज अनधिकृत बांधकामांचं गोदाम बनलंय.

close