निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रूग्णांचे हाल

April 23, 2013 10:05 AM0 commentsViews: 9

मुंबई (23एप्रिल 13): आपल्या विविध मागण्यांसाठी मार्डचे डॉक्टर्स आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचा मोठा फटका रूग्णांना बसतोय. वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्यासोबत काल मार्डची बैठक झाली. पण, त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यातल्या 14 वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 13 महाविद्यालयांमधले मार्डचे डॉक्टर सकाळी 8 वाजल्यापासून संपावर गेले आहेत. तब्बल 3 हजार 500 मार्डचे डॉक्टर्स संपावर गेले आहेत. मात्र हा संप नसून हे सामूहिक रजा आंदोलन असल्याचा दावा मार्डनं केला. पण मार्डनं संपाची नोटीस दिली. त्यामुळे इस्मांतर्गत कारवाई करू, असा इशारा सरकारनं दिला. 5 हजार रुपयांची स्टायपेंड वाढ देण्याची तयारी सरकारनं दाखवली होती. पण मार्डनं ती अमान्य केलीय. मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये संपाची झळ रूग्णांना पोहचू नये यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याचं केईएमच्या कार्यकारी डीन प्रीती मेहता यांनी सांगितलं आहे. मात्र निवासी डॉक्टर कोणत्याही हॉस्पिटलचा कणा असतात, त्यामुळे या संपाचा परिणाम होणारच, असंही त्यांनी मान्य केलंय.

close