दुष्काळग्रस्तांना आशाताईंची पाच लाखांची मदत

April 24, 2013 1:05 PM0 commentsViews: 4

24 एप्रिल

मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस आणखी भीषण होत चाललेली आहे. मराठवाड्यातील अनेक गावात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दुष्काळ निवारण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. शासनाच्या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी दुष्काळनिधीसाठी 5 लाख रूपयांची मदत दिली आहे. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर जाऊन आशाताईंनी 5 लाख रूपयांचा चेक दुष्काळनिधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. दुष्काळ आणि पाणीटंचाईने महाराष्ट्रातील जनता त्रस्त असताना समाजातील प्रत्येकाने आपल्यापरीने दुष्काळग्रस्तांना मदत करणे हे कर्तव्य समजलं पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी आशाताईंनी व्यक्त केली.

आशाताईंना अलीकडेच ह्रदयेश आर्टच्या वतीने ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्काराची एक लाख रूपयांची रक्कम आशाताईंनी दुष्काळग्रस्तांना देणार अशी घोषणा समारंभात केली होती. पुरस्काराच्या या रक्कमेत चार लाखांची भर घालून त्यांनी पाच लाख रुपयांची मदत दुष्काळनिधीला दिली. दुष्काळनिवारण करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या उपाययोजनांना प्रत्येकांचा हातभार लागला पाहिजे आणि त्यात आपलाही छोटासा वाटा असला पाहिजे असं मत आशाताईंनी व्यक्त केलं.

close