फेसबुकवरून विकलं नवजात बाळ, तिघांना अटक

April 24, 2013 5:30 PM0 commentsViews: 57

24 एप्रिल

पंजाबमध्ये एका तीन दिवसांच्या नवजात बाळाला चक्क फेसबुकवरून विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लुधियाना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचं बाळ नको म्हणून आजोबांनीच ते बाळ नर्सला विकलं आणि नर्सने तिच्या मित्राला विकलं आणि तिच्या मित्राने हे बाळ फेसबूकवरून विकल्याचा अजब आणि धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

घडलेली हकीकत अशी की, लुधियाना येथील रहिवासी या मुलीचं लग्न मेरठ इथं झालं. पण लग्न होऊन सहा महिन्यातच तीचा घटस्फोट झाला होता. 8 एप्रिल रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण मुलीच्या वडिलांनी मुलगा मृत जन्मला आला असं खोटं सांगितलं. आणि नर्सला ते नवजात बाळ 45 हजारांना विकलं. सुनीता नावाच्या या नर्सने आपल्या एका मित्राच्या मदतीने गुरप्रीत नावाच्या व्यक्तीला साडे तीन लाखात विकलं. हे प्रकरण इथंच थांबलं नाही. गुरप्रीतने या बाळाला विकण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचा वापर केला. त्याने फेसबुकवर एक जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात पाहून दिल्लीतील एका उद्योगपतीने या बाळाला आठ लाख रूपयात विकत घेतलं. मात्र दोन दिवसांनी हे बाळ आजारी पडलं आणि त्याला पुन्हा दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं. धक्कादायक बाब म्हणजे याच हॉस्पिटलमध्ये त्याचा जन्म झाला होता. जन्मदात्या आईने जेंव्हा या बाळाबद्दल नर्सकडे चौकशी केली तेंव्हा हा सगळा प्रकार उघड झाला. या महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तिचे वडील, नर्ससह तिचा मित्र इरफान आणि आरोपी गुरप्रीतला अटक करण्यात आली. मात्र या सगळ्या प्रकारात सुखद धक्का म्हणजे नवजात बाळ आपल्या आईकडे सुखरूप पोहचले. एखाद्या सिनेमात घडावा असा प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेले होते.

close