‘कामावर रूजू व्हा नाही तर हॉस्टेल सोडा’

April 25, 2013 9:50 AM0 commentsViews: 11

25 एप्रिल

गेल्या तीन दिवसांपासून संपावर असलेल्या निवासी डॉक्टरांनी संध्याकाळपर्यंत कामावर रूजू व्हावे अन्यथा हॉस्टेल रिकामे करावे असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून संपावर गेल्या डॉक्टरांमुळे रूग्णांचे अतोनात हाल होतं आहे. त्यापूर्वी मुंबई हायकोर्टाने काल 'मार्ड' या संघटनेला संप तात्काळ मागे घेण्याचा आदेश दिला. मात्र आडमुठ्या डॉक्टरांचा संप सुरूच आहे.

दरम्यान, मार्ड संघटनेनं आजपासून राज्यातल्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गरीब रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मार्डनं सांगितलंय. या ओपीडींमध्ये सर्व प्रकारचे स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स असतील. तसंच रुग्णांना अत्यावश्यक औषधे मोफत दिली जातील असंही मार्डतर्फे सांगण्यात आलंय. दुसरीकडं जेजे हॉस्पिटलचे डॉक्टरही उद्याऐवजी आजच संपावर जात आहेत. त्यामुळे हॉस्पिटलच्या हॉस्टेल आठ वाजता बंद केली जात आहेत. हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या सरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांच्या सहापैकी दोन मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत, चार मागण्यांचा तिढा कायम आहे. 3,500 पेक्षा जास्त डॉक्टर्स सध्या संपावर आहेत. 15 वैद्यकीय महाविद्यालयं, तीन दंतवैद्यकीय महाविद्यालयं आणि सहा उपनगरीय हॉस्पिटल्समधले मार्डचे डॉक्टर या संपात सहभागी झालेत. सायन, केईएम आणि नायर यांच्याबरोबर मुंबईतल्या सहा उपनगरीय हॉस्पिटलमध्ये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलीय.

close