‘जेपीसीचे चेअरमन चाकोंची हकालपट्टी करा’

April 25, 2013 10:21 AM0 commentsViews: 12

25 एप्रिल

नवी दिल्ली : टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणार्‍या जेपीसीमधले विरोधी पक्षांच्या सदस्यांनी लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांची भेट घेतली आणि जेपीसीचे चेअरमन पी.सी. चाको यांची हकालपट्टी करावी अशी मागणी जेपीसीच्या 15 सदस्यांनी केली. त्यामध्ये भाजप, जेडीयू, तृणमूल काँग्रेससह डाव्या पक्षांच्या खासदारांचा समावेश होता.

त्यापूर्वी जेपीसीची बैठक पुढं ढकलण्यात आली आहे. ही बैठक आज दुपारी तीन वाजता होणार होती. जेपीसीत सरकार अल्पमतात आलंय. अशा वेळी विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणा मान्य कराव्या लागतील या भीतीनंच ही बैठक पुढं ढकलण्यात आल्याची टीका होतेय. दुसरीकडे संसदेतली कोंडी आजही कायम राहिली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार अंबिका चौधरी यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांना आदरांजली वाहून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेत कोळसा खाण वाटप घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, प. बंगालमधला चिट फंड घोटाळा आणि चीनची घुसखोरी या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरलं. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दरम्यान, संसदेतल्या कोंडीविषयी चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ या बैठकीला उपस्थित होते. जेपीसीचे चेअरमन पी. सी. चाको यांना पाचारण करण्यात आलं होतं.

close