निवासी डॉक्टरांच्या संपात फूट

April 25, 2013 2:09 PM0 commentsViews: 15

25 एप्रिल

गेली तीन दिवस रूग्णांना वेठीस धरून बेमुदत संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपात उभी फूट पडली आहे. पुण्यातील डॉक्टरांनी आमच्या पुरेशा मागण्या मान्य झाल्या आहेत असं सांगून संपातून बाहेर पडले आहे. तर दुसरीकडे विधी आणि न्याय खात्यानं डॉक्टरांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मार्डच्या संपकरी डॉक्टरांवर कारवाईची शक्यता आहे.

प्राध्यापकांच्या संप एकीककडे सुरू असतांना मार्डच्या डॉक्टरांनीही बेमदूत संपाचे हत्यार उपसले. 23 एप्रिल पासून राज्यातील 3 हजार 500 डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहे. पण हा संप नसून सामूहिक रजा आंदोलन असल्याचं मार्डने स्पष्ट केलं. डॉक्टरांना मिळणार भत्ता 6 हजारवरून वाढवून 15 हजार करण्यात यावा आणि हा भत्ता 2009पासून द्यावा तसंच केंद्र सरकारची सेंट्रल रेसिडेंसी योजना राज्यातल्या निवासी डॉक्टरांनाही लागू कराव्या अशा विविध मागण्या डॉक्टरांनी केल्या आहे. सरकारने 5 हजार रुपयांची स्टायपेंड वाढ देण्याची तयारी दाखवली. पण मार्डनं ती अमान्य केली.

तीन दिवसांपासून पुकारलेल्या या संपामुळे राज्यभरात वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झाला. मुंबई हायकोर्टाने 'मार्ड' या संघटनेला संप तात्काळ मागे घेण्याचा आदेश दिला. मात्र मार्डने संप सुरूच ठेवला अखेर आज सरकारने डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा दिला. संपकरी डॉक्टरांनी संध्याकाळपर्यंत कामावर रूजू व्हावे अन्यथा हॉस्टेल रिकामे करावे असा इशारा राज्य सरकारने दिला. सरकारने अगोदरच मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा देऊन सुद्धा आडमुठ्या डॉक्टरांनी संप सुरूच ठेवलाय. आज पुण्यातील डॉक्टरांना वैद्यकीय मंत्री विजय गावित यांच्याशी चर्चा करून आमच्या पुरेशा मागण्या मान्य झाल्या असं सांगून संपातून बाहेर पडले आहे. मात्र मुंबईतील डॉक्टरांचा संप अजूनही सुरूच आहे.

close