‘मार्ड’संप मागे घेण्यास तयार

April 25, 2013 4:18 PM0 commentsViews: 20

25 एप्रिल

पुण्यातील निवासी डॉक्टरांनी संपातून बाहेर पडल्यामुळे 'मार्ड'च्या संपात फूट पडली. आणि अखेर आम्ही संप मागे घेण्यास तयार आहोत अशी घोषणा मार्डचे अध्यक्ष डॉ. संतोष वाकचौरे यांनी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून केली. आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत. आम्हाला कोर्टाचा पूर्ण आदर आहे. कोर्टाचा अवमान करण्याचा आमच्या कोणताही इरादा नाही. म्हणून आम्ही संप मागे घेण्यास तयार असून माझा निर्णय हा मार्ड संघटनेला मान्य आहे अशा शब्दात वाकचौरे यांनी मार्डचा संप मिटल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच आमचं आंदोलन सुरूच राहिल. यापुढची लढाईही कोर्टात लढणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवासी डॉक्टरांच्या संघटनेने म्हणजेच 'मार्ड'ने पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस मावळत असतानाच आज या संपामधून पुण्यातील मार्डचे डॉक्टर बाहेर पडले. मार्डच्या संपातून पुण्याचे डॉक्टर बाहेर पडल्यानंतर संपात फूट पडल्याचं तिसर्‍याच दिवशी स्पष्ट झालंय. त्यामुळे संप आणखी किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित झाला. इकडे, मुंबईसह इतर ठिकाणी दिवसभर मार्डच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलबाहेर ओपीडी चालवल्या. आणि शेकडो पेशंट्सची तपासणी केल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात हजारो पेशंट्स दरदिवशी हॉस्पिटलच्या ओपीडी मध्ये येतात. त्या सगळ्यांची डॉक्टरांच्या संपामुळे आबाळ झाली.

निवासी डॉक्टर हे शिकावू डॉक्टर असतात. त्यामुळे, त्यांनी सरकारने दिलेली पाच हजार रुपयांची विद्यावेतन वाढ मान्य करावी आणि संप तातडीने मागे घ्यावा असं आवाहन सरकारने केलंय. सरकारने या शिकावू डॉक्टरांना नवी मुदत दिलीय आणि तातडीने, संप मागे घ्यावा असं सांगितलं आहे. मुंबई हायकोर्टानेही मार्डला संप मागे घेण्याचे आदेश दिले होते. मात्र मार्डने संप मागे घेतला नाही.

अखेरीस आज सरकारने मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला. आणि आज संध्याकाळी पुण्यातील डॉक्टरांनी आमच्या पुरेशा मागण्या मान्य झाल्यात असं सांगत संपातून बाहेर पडले. आयबीएन लोकमतच्या 'प्राईम टाईम' बुलेटीन कार्यक्रमात मार्डचे अध्यक्ष संतोष वाकचौरे यांनी संप मागे घेण्यास तयार असल्याची घोषणा केली. आम्ही सरकारशी वाटाघाटी करण्यास तयार आहोत. आम्हाला कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे आम्ही संप मागे घेऊ असं सांगितलं. सरकारने अगोदरच संप मागे घेण्याचा आदेश दिला होता. उद्या संप मागे घेण्याची औपचारीक घोषणा मार्ड कधी करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close