भारताची डोकेदुखी वाढली, ‘ड्रॅगन’मागे हटेना !

April 25, 2013 5:30 PM0 commentsViews: 34

25 एप्रिल

चीननं लडाखमध्ये भारतीय हद्दीत घूसखोरी केलीय. या गोष्टीला 10 दिवस उलटून गेलेत. पण, चीन माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनलीय. या प्रश्नी सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केली आहे. हा तिढा सोडवण्यासाठी आता खुद्द परराष्ट्र मंत्री चीनला जाणार आहेत.

चीननं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानं भारत आणि चीन सीमेवर तणाव निर्माण झालाय. दहा दिवस झालेत पण या वादावर कुठलाही तोडगा अजून दिसत नाही. गेल्या काही दिवसात दोन्ही देशांमध्ये दोन फ्लॅग मिटिंग झाल्या आहेत. पण, त्या निष्फळ ठरल्या आहेत. आता खुद्द परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद पुढच्या महिन्यात चीनला जाणार आहेत.

यापूर्वी झालेल्या फ्लॅग मिटिंगमध्ये चीननं भारतीय हद्दीतून मागे जावं अशी सूचना भारतानं केली होती. यावर प्रत्यक्ष सीमारेषेजवळ भारतानं सुरू केलेलं पायाभूत सुविधांचं बांधकाम थांबवावं, अशी मागणी चीननं केली होती.

पण, तज्ज्ञांच्या मते भारतानं आता माघार घेतली तर लडाखमधल्या दौलत बेग ओल्डी म्हणजेच डीबीओ सेक्टरमध्ये चीन अधिक लष्कर तैनात करेल. यामुळे चुशुल, डेमचॉक आणि चुमूर या भागांमध्ये दोन्ही सैन्य समोरासमोर येतील आणि तणाव वाढेल. याच डीओबी सेक्टरमध्ये भारताचं अत्याधुनिक लैंडिंग ग्राऊंड आहे. पण, आमच्या सैन्यानं प्रत्यक्ष सीमेरेषा ओलांडलेली नाही, असा कांगावा चीन करतोय.

चीनच्या लष्करानं 15 एप्रिलला लडाख भागातल्या डीओबी सेक्टरमध्ये आपले तंबू ठोकले. हा भाग प्रत्यक्ष सीमारेषेपासून 10 किलोमीटर आत आहे. चीनकडून गेल्या काही महिन्यात अनेकवेळा अशी घुसखोरी झाली आहे. पण, दरवेळी ते माघारी गेले. यावेळी मात्र त्यांना माघारी जायला नकार दिलाय. म्हणूनच भारताच्या दृष्टीनं ही गंभीर बाब आहे.

- युद्धसदृश्य परिस्थिती उद्भवलीच तर भारताची बाजू खूप कमकुवत आहे- भारताकडे 70 हजार लष्करी तुकड्या आहे. पण, चीनकडे जवळपास 2 लाख लष्करी तुकड्या आहेत- चीनकडे असलेले अत्याधुनिक फायटर जेट, क्षेपणास्त्र तळ बघता भारताची हवाई ताकदही खूप कमी आहे – याशिवाय लडाखमध्ये रस्तेही खूप चांगले नाही. उलट चीननं आपल्या भागात वाहतुकीच्या उत्तम सोयी केल्या आहेत

भारत-चीन सीमावादानं पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. या परिस्थितीत भारताकडून खंबीर भूमिकेची गरज व्यक्त होतेय.

close