पाईपफुटीचे राजकारण सुरू

April 1, 2010 1:59 PM0 commentsViews: 1

आशिष जाधव, रणधीर कांबळे, मुंबई

मुंबईत पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

पाईपलाईनच्या सुरक्षेच्या 100 कोटी रुपयांच्या टेंडरमुळेच महानगरपालिकेचे अधिकारी जलवाहिन्या फोडत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत केला.

तसेच याबाबत त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. तर राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईवर पाणीटंचाईचे संकट ओढावल्याची अशी टीका शिवसेनेने केली आहे.

सध्या मुंबईला चार हजार 200 एमएलडी इतक्या पाण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात मुंबईला 2900 एमएलडी इतकेच पाणी पुरवले जाते. त्यामुळे मुंबईत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

आधीच पाण्याची टंचाई त्यात आता पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. रोज कुठेना कुठे पाईपलाईन फुटते. राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयासमोरही पाईपलाईन फुटली.

या पाईपलाईन्सच्या सुरक्षेसाठी 100 कोटी रूपयांचे टेंडर 12 खाजगी कंपन्यांना द्यायचे आहे. त्यामुळेच महापालिकेचे अधिकारी टेंडर फोडण्याचे काम करत आहेत असा आरोप भाजपने विधानपरिषदेत केला.

मुंबईतील पाणीगळतीवर सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. गेल्या सहा महिन्यांत वॉटरमाफियांवर 118 गुन्हे दाखल करण्यात आले. तर 378 पंप जप्त करण्यात आले. तसेच 1200 अनधिकृत नळ कनेक्शन्स तोडण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारने कर्नाटकला डिसॅलिनेशन प्रकल्पासाठी 830 कोटी रुपये दिले. मात्र मुंबईतील डिसॅलिनेशन प्रकल्पासाठी केंद्राने कवडीही दिली नाही, ही बाब सरकारनेच कबूल केली आहे.

close