शिवाजी पार्कवर आज नागरिकांची बैठक

April 2, 2010 9:54 AM0 commentsViews: 7

2 एप्रिल

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाच्या वादावर आज संध्याकाळी महापौर श्रध्दा जाधव यांनी नाना नानी पार्कमध्ये नागरिकांची बैठक बोलावली आहे.

पार्कच्या सुशोभीकरणावर स्थानिकांना काय वाटते, हे महापौर जाणून घेणार आहेत. नागरिकांचा विरोध या सुशोभीकरणाला असेल तर हे काम केले, जाणार नाही असे महापौर श्रध्दा जाधव यांनी म्हटले आहे.

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. पण स्थानिक नागरिकांना विचारात न घेता महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने हे काम सुरू केले. म्हणून मनसेने शिवाजी पार्कच्या या कामाला विरोध केला. आणि बुधवारी हे काम बंद पाडले.

या कामाचे ओपन टेंडरही काढले नाही, यात छुपा कारभार झाला, असा आरोपही केला जात आहे.

सेना विरुद्ध मनसे

रोहिणी गोसावी, विनोद तळेकर, मुंबई

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर आता शिवसेना आणि मनसे असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेच आता दोन्ही पक्ष तयारीला लागलेत याचे हे संकेत आहेत.

शिवाजी पार्कचे सुशोभीकरणाचे काम मनसेने बंद पाडल्याने शिवसैनिक संतापले. बुधवारी रात्री उशिरा अनेक शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले. आणि गुरूवारी सकाळी या कामाला शिवसैनिक सुरक्षा देतील असे जाहीर केले.

तणाव वाढल्याने मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी हस्तक्षेप करत तोडगा काढला. याबाबत शुक्रवारी मनसे, शिवसेना आणि शिवाजी पार्कचे रहिवाशी यांची एक बैठक आयोजित करण्यात आली.

सात कोटींचे हे काम मनसेने रोखल्याने शिवसेना संतापली आहे. पण मनसेने स्थानिकांची बाजू उचलून धरल्याने सेनेची अडचण झाली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळच्या व्यक्तीने मनसेच्या स्थानिक आमदाराला हा मुद्दा जास्त ताणू नका, अशी विनंती केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

एकूणच काय तर दोन वर्षांनी होणार्‍या महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे, एवढे खरे.

close