अकोल्यात बोकडांचा बळी

April 2, 2010 10:02 AM0 commentsViews: 13

जयेश जगड, अकोला

2 एप्रिल

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सौंदळा इथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला दुर्गादेवीची यात्रा भरते. संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत श्रद्धेच्या नावाखाली अनेक अघोरी प्रथा पाहायला मिळतात.

याविरोधात प्रशासन आणि सामाजिक संघटनांकडून जनजागृतीचा प्रयत्न केला जातो. पण यावेळीही अडीचशेहून अधिक बोकडांचा बळी या यात्रेत गेला आहे.

अकोला जिल्ह्यातील सौंदळा इथे दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. विदर्भासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील भाविकही इथे भरणार्‍या यात्रेसाठी हजेरी लावतात.

देवीच्या कृपेने 1913 मध्ये या ठिकाणी पसरलेली प्लेगची साथ नष्ट झाली अशी इथल्या भाविकांची समजूत आहे. आणि यामधूनच सुरू झाल्यात काही अघोरी प्रथा. ज्या आजही सर्रास सुरू आहेत.

उघड्या डोळ्यांनी न पाहू शकणार्‍या कृती इथे प्रथा म्हणून केल्या जातात. मंदिराच्या पायरीवर बोकडांचे बळी देऊन त्यांना तिथेच दफन करणे, कोंबडीचे पिल्लू जिवंत गाडणे, काट्यावरून लोटांगण घालणे, नाडा टोचून घेणे, डोळ्यांत लिंबू पिळणे, या अशाच काही अंगावर काटा आणणार्‍या अघोरी प्रथा.

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी यासंदर्भात जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. पण वेळेवरच्या जनजागृतीपेक्षा लोकांमध्ये वारंवार हा विषय नेणे गरजेचे असल्याचे मत, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मांडले आहे. जादूटोणाविरोधी कायदाच याला सक्षम पर्याय असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

या प्रथा पाळणार्‍यांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण आत्मचिंतन करायला लावणारे आहे. पुरोगामित्वाची पताका फडकत ठेवणार्‍या महाराष्ट्रात अशा प्रथांविरोधात जनजागृती आवश्यक आहे.

close