महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची विशेष मुलाखत

May 1, 2013 5:59 PM0 commentsViews: 120

01 मे

मुंबई : मला माझ्या पक्षाचा विस्तार करणे, वाढवणे, पक्षाचे विचार आणि सद्धा जी महाराष्ट्राची स्थिती आहे ति लोकांपर्यंत पोहचवणे एवढाच एककलमी कार्यक्रम आता माझ्या डोक्यात आहे. युती वगैरे करण्याचा विषय माझ्या डोक्यात बिल्कुल येत नाही. युत्या आणि आघाड्या करून राजकीय पक्ष मोठा करता येत नाही. किंवा पुढे जाताही येत नाही. एकला चलो रे एवढाच माझा नारा आहे. युती वगैरेचा विचार माझ्या डोक्यात शिवत सुद्धा नाही. लोकसभेच्या निवडणुकीही स्वबळावरच लढणार असं रोखठोक मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र दिनानिमित्त आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी राज ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.

या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक विषयांना हात घालत रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागली. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार ही खुर्च्यांवर बसवलेली माणसं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर शाळेत जसा ऑफ पिरेड असतो त्यावेळी एखादे मास्तर येवून बसतात तसे पृथ्वीराज चव्हाण येऊन बसले आहे असा ठाकरी टोला राज यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धत वरच्यावर चांगली दिसते. पण मुळात मुद्यावर येतं काय ? शेवटी मुख्यमंत्री राज्याचा हेड आहे. मग दुष्काळ पडला कसा ? ते म्हणतात, आम्ही चारा छावण्या उभ्या केल्यात, पाणी दिलं मग पैसा गेला कुठे ? धरणं का बांधली गेली नाही ? मध्यंतरी श्वेतपत्रिकेचे नाटक केलं अजित पवारांना क्लीन चिट दिली. पण क्लीन चिट यांनी द्याची नसते तर ती लोकांनी द्यायची असते. मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळ्यावर पांघरून घातलं आणि अजित पवारांना वाचवलं. त्यांनी असं समजू नये की, मी चांगला आहे आणि बाकीचे बरबटलेले आहे. राष्ट्रवादी जितकी जबाबदार आहे तितकेच मुख्यमंत्री जबाबदार आहे असा आरोपही राज ठाकरे यांनी केली.

close