शिवसेना काँग्रेस होऊ लागलीय का ?-कदम

May 1, 2013 6:02 PM0 commentsViews: 84

01 मे

मुंबई : शिवसेनेतला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. आणि या वादाला तोंड फोडलं आमदार रामदास कदम यांनी… पाच-सहा महिने गेले की, रामदास कदम राष्ट्रवादीत चालले, मनसेत चालले. पण मी बाडगा नाही. माझ नासलेलं रक्त नाही. मी मरेन तर भगव्या झेंड्या खालीच मरेल. पण माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातं आहे. कदाचित स्वकीय सुद्धा यात असतील पण हे नेमके कोण आहे हे उद्धव यांच्याकडे बोलणार असं सांगत रामदास कदम यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. तसंच शिवसेना काँग्रेस होऊ लागलीय की काय अशी शंका उपस्थित करून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही शिवसेनेशी एकनिष्ठ राहीन असं सांगत त्यांनी या वावड्या उठवण्यामागे नेमकं कोण आहे हे शोधून काढायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. माझ्या विरोधात षडयंत्र करण्यापूर्वी मुंबई, लालबाग, दादर हे शिवसेनेचे बालेकिल्ले नेमके का गेले ? याचा विचार वरिष्ठांनी करायला हवा असा टोलाही त्यांनी हाणला. आता आपल्यातले मतभेद विसरून बाळासाहेबांचं स्वप्न साकार करून दाखवण्याची वेळ आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचं काय होणार असा प्रश्न लोकं विचारत होती. पण उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भर सभा घेऊन लोकांची तोंडं बंद केली. गटप्रमुख हा पक्षाचा पाया आहे. फक्त आमदार,खासदारांनी निवडणुका पुरते राहू नये इतर वेळाही पाठीवर हात ठेवला पाहिजे. पण ज्यांना ज्यांना निवडून दिले त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली तर काय चुकले ? अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

close