कोण होते सरबजीत !

May 2, 2013 5:42 PM0 commentsViews: 43

02 मे

आपली कधीतरी सुटका होईल या आशेवर सरबजीत सिंगनं तब्बल 23 वर्षं पाकिस्तानच्या तुरुंगात घालवली. पण, तुरुंगातल्याच एका कैद्यानं केलेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. कोण होते सरबजीत, त्यांच्यावर काय आरोप होते..?

गेली दोन दशकं भारतात चर्चेचा विषय असलेले सरबजीत सिंग यांचा हा एकमेव व्हिडिओ भारतानं पाहिला. पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी सरबजीतला बळजबरीनं गुन्हा कबूल करायला भाग पाडलं, तो हो व्हिडिओ…

पाकिस्तानात 1990 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 14 जण ठार झाले होते. या हल्ल्याचा कट रचणं आणि बॉम्ब पेरणं, या आरोपांखाली सरबजीत यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. एफआयआरमध्ये त्यांचं नाव मंजीत सिंग लिहण्यात आलं होतं. आपण निर्दोष असल्याचं सरबजीत यांनी वारंवार सांगितलं. पण, पाकिस्तानात त्यांचं म्हणणं कुणीही ऐकलं नाही.

सरबजीतवर वेळोवेळी अन्याय होऊनही भारत सरकारनं हे प्रकरण नेटानं लावून धरलं नाही. सरबजीत यांची बहीण दलबीर कौर यांनी मात्र गेली 23 वर्षं हा लढा सुरू ठेवला. भारतात येणार्‍या प्रत्येक पाकिस्तानी नेत्याला त्या भेटल्या आणि आपल्या भावाच्या सुटकेची विनवणी केली. 2008मध्ये पाकिस्तान सरकारनं त्यांना सरबजीतला भेटण्याची परवानगी दिली. पण, त्यानंतरही दलबीर फक्त दोन वेळा आपल्या भावाला भेटू शकल्या.

पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांनी 2008मध्ये सरबजीत यांची फाशी स्थगित केली. पण, त्यांची सुटका केली नाही. सरबजीतबरोबरचे इतर भारतीय कैदी सुरजीत सिंग, काश्मीर सिंग आणि गोपाल दास यांची मात्र सुटका झाली.

भारतानं फेब्रुवारीमध्ये अफझल गुरुला फाशी दिली त्यावेळी याची संतप्त प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटली होती. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोघांनीही भारतीय कैद्यांच्या सुरक्षेकडे लक्ष्य देण्याची गरज होती. पण, सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे हे स्वत: सरबजीत सिंग यांनी मार्चमध्ये आपल्या बहिणीला लिहलेल्या पत्रात म्हटलं होतं. पण, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

close