जळगावच्या शेतक-यांना तलाठ्यानं फसवलं

December 30, 2008 4:14 AM0 commentsViews: 2

30 डिसेंबर, जळगाव सतीश पाटील गाळपाविना उभ्या असलेल्या उसासाठी शासनानं अनुदान जाहीर केलं आहे. पण चकरा मारुनही शेतक-यांना अनुदान मिळत नाहिये. कारण पंचनामा करूनही त्याचा अहवाल काही अधिकार्‍यांनी म्हणजे तलठ्यानं सरकारकडे दाखलच केलेला नाही.जळगांव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सरकारी अधिका-यांच्या बेपर्वाईच्या वागणुकीमुळं जळगावच्या शेतक-यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जळगांव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातल्या कोळपिंपरी गावातले शेतकरी शांताराम पाटील यांच्या तोंडचे पाणी पळालेले आहे. आपल्या 1 हेक्टर शेतांत त्यांनी ऊसाची लागवड केली होती. सरकारी अनुदानासाठी तलाठ्यानं त्यांच्या शेतातल्या उसाच्या पिकाची मोजणी करून पंचनामा केला.पण 6 महिन्यांपासून अनुदानासाठी तहसीलचे खेटे मारणार्‍या शांताराम पाटील यांना मिळलं फक्त अनुदानाचं गाजर.कारण त्यांचा केलेला पंचनामा सरकाकडे पाठवलाच गेला नव्हता. " तलाठ्यानं शेताचा पंचनामा करून घेतला. त्यानंतर शासन मदत जाहीर करेल, असं वाटलं होतं. पण तलठ्यानं आमच्या शेतात केलेले पंचनामे तहसील कार्यालयापर्यंत गेलेलेच नाही. त्यामुळे आम्हाला मदत मिळू शकणार नाही. आता आम्ही काय करायचं याकडे लक्ष लागून राहिलं आहे, " असं शेतकरी शांताराम पाटील खिन्नपणे म्हणाले. ही परिस्थिती एकट्या पाटलांची नाही तर अनेक शेतक-यांना सरकारी अधिका-यांच्या दप्तरदिरंगाईचा फटका बसला आहे. पंचनाम्यानंतर व्याजानं पैसे काढून जळगावच्या ऊस शेतक-यांनी आपला उभा ऊस कापला. जळगावच्या शेतक-यांची परिस्थितीही बेताची आहे. " शासनाची मदत आल्यानंतर आम्ही चौकशी केली तर आमचे पंचनामे तिथं मिळालेच नाहीत. आम्ही काय करायचं, ही चिंता लागून राहिली आहे. व्याजानं पैसा घेऊन मी माझ्या मुलीचं लग्न केलं आहे. कर्जाचा डोंगर काही केल्या संपत नाही. तो वाढतच आहे. शासनाची थोडी मदत मिळणार होती, त्यापासूनही आम्हाला वंचित राहावं लागलं आहे. आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय आमच्या पुढे नाही, " ही व्यथा विनोद पाटील या शेतक-यानं मांडली. तलाठी ए.डी.पाटील यांच्या चुकीमुळं शेतक-यांना हा फटका बसल्याचं मंडल अधिका-यांच म्हणणंयं. पण याच्यात भरडला जातोय तो फक्त गरजू शेतकरी. " शेतक-यांच्या समस्येचा तोडगा तहसीलदारसाहेबच काढतील. शेतक-यांच्या शेतजमिनीच्या पंचनाम्याला बराच काळ लोटला आहे. एवढ्या मोठ्या विलंबामुळे शासनही काहीच करू शकणार नाही, असं मंडल अधिकारी यु.आर.पाटील यांचं म्हणणं आहे. तहसीलदारांनी मात्र याबाबत बोलायलाच नकार दिला आहे. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद मागायची कुणाकडे अशी शेतकर्‍याची परिस्थीती झाली आहे.

close